टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी नियमित (रेग्युलर) रेल्वेगाडय़ा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी,  रेल्वेला रोज सुमारे साडेचार हजार तर गेल्या १२ महिन्यात तब्बल ४१ हजार ६२५  गाडय़ा रद्द कराव्या लागल्या आहेत.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी २४ मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यासोबत रेल्वे सेवा बंद करण्यात आली. ही टाळेबंदी नंतर हळूहळू शिथिल करण्यात आली. मात्र, नियमित गाडय़ा सुरू झाल्या नाहीत. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यात ४ हजार २४० रेल्वेगाडय़ा आणि फेब्रुवारीमध्ये ३ हजार ८८६  गाडय़ा धावल्या. मार्चअखेर टाळेबंदी लागू झाली आणि त्या महिन्यात १ हजार ४८९ रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या. मात्र  रेल्वेने टाळेबंदी खऱ्या अर्थाने एप्रिल महिन्यात पाळल्याचे दिसून येते. या  महिन्यात एकही गाडी धावली नाही.  या महिन्यात तब्बल ४ हजार ३९० गाडय़ा रद्द करण्यात आल्या. अशाप्रकारे जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल ४१ हजार ६२५गाडय़ा रद्द करण्यात आल्या.

नवीन वर्षांतही नियमित रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात आल्या नाहीत.  प्रत्येक महिन्याला सरासरी सव्वाचार ते साडेचार हजार  गाडय़ा रद्द केल्या जात आहेत. रेल्वेच्या सध्या  विशेष गाडय़ा असल्याने यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग, बालक यांना सवलती दिल्या जात नाहीत. या गाडय़ांमधून बर्थ आरक्षित केल्याशिवाय प्रवास करता येत नाही.  मे महिन्यापासून विशेष रेल्वे गाडय़ांना सुरुवात झाली आणि सध्या दीड हजारच्या आसपास विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात येत आहेत. डिसेंबर २०२० मध्ये ४ हजार ४५७ रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या तर याच महिन्यात एक हजार ५७१ विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे.

* १ जानेवारी ते ३१ डिसेंबपर्यंत ७७.८८ लाख नागरिकांचा प्रवास

* १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून ७७.८८ लाख प्रवाशांनी तिकीट खरेदी केले. यातून रेल्वेला १६९.७९ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. याच कालावधीत मालवाहतुकीतून २५८०.३१ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.