25 September 2020

News Flash

Coronavirus : मध्यवर्ती कारागृह नवीन ‘हॉटस्पॉट’!

कारागृहातील ४४ जणांसह एकूण ७३ बाधितांची भर

कारागृहातील ४४ जणांसह एकूण ७३ बाधितांची भर

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी, त्यांच्या नातेवाईकांसह ४४ जण व जिल्ह्य़ातील इतर ठिकाणचे काही रुग्ण मिळून आज बुधवारी एकूण ७३ नवीन  करोनाग्रस्त आढळून आले. मध्यवर्ती कारागृह आणि त्याला लागून असलेल्या पोलिसांच्या वसाहतीत मोठय़ा संख्येने बाधित आढळल्याने हा नवीन हॉटस्पॉट ठरणार काय, अशी चिंता आरोग्य विभागाला लागली आहे.

मध्यवर्ती कारागृहात संक्रमण टाळण्यासाठी १४ दिवसांत आळीपाळीने  अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा लावली जाते. दरम्यान, २६ जूनला सेवा देऊन बाहेर पडलेल्या एका शिपायाला करोनाचे निदान झाल्यावर ३० जूनला येथील आणखी एका अधिकाऱ्यासह ८ कर्मचारी अशा एकूण ९ जणांना विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून येथील सत्तरच्या जवळपास व्यक्तींचे नमुने तपासले असता त्यातील आणखी ४४ जणांना विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले आहे. पैकी काही जण मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी तर काही जण कारागृहाला लागून असलेल्या वसाहतीतील बाधितांचे नातेवाईक आहेत.

कारागृह परिसरातून मोठय़ा संख्येने बाधित वाढत असल्याने शहरातील मोमीनपुरा, सतरंजीपुरा, नाईक तलाव- बांगलादेशनंतर हा नवीन करोना हॉटस्पॉट होण्याचा धोका वाढला आहे. या रुग्णांसह कामठीतील सैन्य रुग्णालयातील ६, लोहारपूरा (बजेरिया) १, मोमीनपुरा  १, हसनबाग  १, विनोबा भावे नगर १, काटोल १, डागा रुग्णालय १, व्यहाड प्राथमिक आरोग्य केंद्र २ आणि इतर असे दिवसभरात वेगवेगळ्या भागातून तब्बल ७३ नवीन बाधित वाढले आहेत. कारागृहात सध्या साडेअठराशेच्या जवळपास कैदी असल्याने त्यांचीही करोना तपासणी होणार काय, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

३८ जण करोनामुक्त 

मेडिकलमधून १९, मेयोतून १६ आणि एम्समधून ३ असे एकूण ३८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. त्यामुळे आजपर्यंत शहरातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या थेट १,३४७ च्या जवळपास पोहचली आहे.  शहरात या आजाराने २५ जण दगावले असून यापैकी एक अपघातात दगावलेला आहे.

प्रसूतीनंतर महिलेचा अहवाल सकारात्मक

डागा रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला करोनाची बाधा असल्याचे बुधवारी  स्पष्ट झाले. त्यानंतर  उत्तर नागपुरातील राजीव गांधी नगरातील या महिलेसह तिच्या नवजात बाळालाही मेयो रुग्णालयात  हलवण्यात आले. बाळाचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे.

चार परिसर बंद, दोन मोकळे केले

शहरात नव्याने करोना रुग्ण सापडलेले चार परिसर बंद केले, तर रुग्ण नसलेले दोन प्रतिबंधित परिसर मोकळे करण्यात आले आहे. धंतोली झोनअंतर्गत रेणुका नगरी येथे करोना रुग्ण आढळल्यामुळे या परिसरातील वांदिले यांचे घर, अनिल बंबावाले, प्रभाकर गायकवाड व यासटवार यांचे निवासस्थान, गांधीबाग झोनतंर्गत परदेशी तेलीपुरा परिसरातील  एन.एस फास्ट फूड, वर्मा इमारत, अनुष्का ब्युटी पार्लर व उमरेठे यांचे घर, तर याच झोनअंतर्गत डोबी नगर अन्सार मशीदजवळील निसार भाई यांचे घर, बब्बू पानठेला व डेड गल्ली परिसर बंद करण्यात आले.  गांधीबाग झोनअंतर्गत भानखेडा कब्रस्तान व टिमकी (पटवी मंदिर) परिसरात करोना  रुग्ण नसल्यामुळे  ते मोकळे करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:22 am

Web Title: 44 men in nagpur central jail test positive for coronavirus zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 २१ महिन्यांत ११६ किमी रेल्वेमार्ग
2 २४ तास बाह्य़रुग्ण सेवा!
3 सारसांच्या प्रदेशात पहिल्यांदाच फ्लेमिंगोंचा प्रवेश
Just Now!
X