नागपूर : राज्यात अनेक पक्षी नामशेष होत असताना ‘सारस’ या पक्ष्याचे अस्तित्व राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्याने टिकवून ठेवले आहे. नुकत्याच झालेल्या सारस गणनेत या जिल्ह्यात सुमारे ४५ सारस आणि त्यांची घरटी आढळली. तरीदेखील मागील वर्षी काही सारस पक्ष्यांचे दर्शन न होणे आणि काहींचे मृत्यू, यामुळे त्यांच्या अस्तित्वाविषयीची चिंता आणखी वाढली आहे.

नामशेष होण्याच्या मार्गावरील या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यतील शेतकरी व सारस संवर्धक गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. राज्यातील या एकमेव जिल्ह्यात सारस पक्ष्याचे वास्तव्य असल्याने गेल्या काही वर्षांपासून त्यांची गणना आणि त्यातून संवर्धनाचे कार्य ते करत आहेत.

२०१७ साली ३५ ते ३८च्या आसपास सारस होते. कमी झालेला पाऊस, वीजप्रवाह आणि विषबाधेमुळे प्रौढ आणि तरुण सारस पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने २०१८ मध्ये संख्या कमी राहील, अशी शक्यता होती. मात्र, २०१८ मध्ये ४० ते ४२च्या संख्येने सारस आढळले. यावर्षीही उन्हाच्या तडाख्यामुळे सारसांची संख्या कमी असेल, असे वाटले होते. काही ठिकाणी त्यांचेअस्तित्व नाहीसे  झाले असतानाही इतर ठिकाणी संख्या वाढली आहे. याशिवाय सारसांची घरटीदेखील वाढलेली आढळून आली. विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्यत यावेळी काही नवीन ठिकाणी त्यांचे अस्तित्व आढळून आले. त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी ‘सेवा’च्या माध्यमातून प्रयत्न करता येईल, असे संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी सांगितले. यावर्षी वनखात्यालाही जाग आली आणि सारस गणनेसाठी त्यांनी मदतीचा हात दिला. मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यात सुमारे ५० ते ६० ठिकाणी सेवा संस्थेचे सदस्य, शेतकरी, सारस मित्र आणि गोंदिया व बालाघाट जिल्ह्यतील वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी गणनेत सहभागी होते. बालाघाट जिल्ह्यकरिता २० तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यकरिता २२ जण अशी दोन पथके पहाटे पाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत गणनेत सक्रिय होती. शेत आणि तलाव हा सारसांचा अधिवास असल्याने याच ठिकाणी गणना करण्यात आली. या अभियानात गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवते, पी.बी. चन्न्ो, शेषराव आकरे, वनक्षेत्रपाल अरुण साबळे, तसेच बालाघाटचे मंडळ अधिकारी देवप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक विकास माहोरे व इतर वनकर्मचारी सहभागी होते. सारस संवर्धनाची सुरुवात करणारे मुकुंद धुर्वे, तसेच सेवा संस्थेचे भरत जसानी, संजय आकरे, प्रवीण मेंढे, नदिम खान, दुष्यंत रेभे आदी सहभागी होते.

सारस संख्या

* जिल्हा – २०१८ – २०१९

* गोंदिया – ३४ ते ३८ – ४० ते ४२

* भंडारा – ०३ – ०३

* चंद्रपूर – ०१ – ०१

* बालाघाट(म.प्र.) – ४४ ते ४८ –  ५२ ते ५४