24 September 2020

News Flash

केवळ ६,३२१ चाचण्या; तरीही १,९५७ बाधित

२४ तासात ४८ करोनाग्रस्तांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

२४ तासात ४८ करोनाग्रस्तांचा मृत्यू

नागपूर : चाचण्या वाढवण्याची गरज असतानाच सलग दुसऱ्या दिवशी चाचण्यांची संख्या केवळ ६ हजार ३२१ एवढी कमी नोंदवली गेली. त्यानंतरही जिल्ह्य़ात तब्बल १ हजार ९५७ नवीन बाधित आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. याशिवाय २४ तासांत ४८ बाधितांचा मृत्यू झाला.

जिल्ह्य़ात पूर्वी रोज ८ ते ९ हजार आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्या होत होत्या. परंतु सोमवारी जिल्ह्य़ात केवळ ४ हजार ६३३ चाचण्या झाल्या. आज मंगळवारी ६ हजार ३२१ चाचण्या झाल्या. तरीही  शहरात १ हजार ७०५, ग्रामीणमध्ये २४८, जिल्ह्य़ाबाहेरील  ६ अशा एकूण १ हजार ९५७ जणांना करोना असल्याचे  पुढे आले. चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण तब्बल ३१ टक्के आहे.

नवीन बाधितांमुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ४३ हजार ९६२, ग्रामीणचे ११ हजार १२९, जिल्ह्य़ाबाहेरील ३३९ असे एकूण ५५ हजार ४३० वर पोहचली आहे. दिवसभरात शहरात दगावलेल्या ४८ रुग्णांपैकी २९ मृत्यू शहर, १३ ग्रामीण, ६ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. २४ तासात शहरात ३ हजार १८५ आरटी पीसीआर आणि २ हजार ६७० रॅपिड अँटिजन चाचण्या झाल्या. ग्रामीणमध्ये २०२ आरटीपीसीआर आणि केवळ २६४ रॅपिड अँटिजन चाचण्या झाल्या. ही संख्या फार कमी असल्याने व त्याचे कारण प्रशासन लपवत असल्याने  आश्चर्य व्यक्त होत आहे.

साडेतीन हजारांवर बाधित रुग्णालयांत

शहरात ६ हजार ८१०, ग्रामीणमध्ये ४ हजार ५३४ असे एकूण ११ हजार ३४४ सक्रिय करोनाबाधित आहेत. यापैकी ५ हजार ७५७ रुग्ण गृह विलगीकरणात तर ३ हजार ६३० जण जिल्ह्य़ातील विविध रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. दाखल रुग्णांपैकी अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून काही व्हेंटिलेटरवर आहेत.

ध्रुव लॅबला पाच लाखांचा दंड

करोना संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने धृव पॅथॉलॉजी लॅबवर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून पुढील आदेशापर्यंत पॅथॉलॉजी लॅब मध्ये तपासणीचे काम आवश्यक पूर्तता होईपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांनी साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत ही कारवाई केली आहे. ध्रुव लॅब, सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांना नोटीस देण्यात आली होती.  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांच्या नेतृत्वात पथकाने या पॅथॉलॉजीची पाहणी केली . त्यात ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची नियोजित वेळ नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच नोटिसची कारवाई करण्यात आली होती.

दीड हजारावर करोनामुक्त

शहरात १ हजार ३६०, ग्रामीणमध्ये ३०६ असे एकूण १ हजार ६६६ जण दिवसभरात करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३४ हजार ४५६, ग्रामीणमध्ये ११ हजार १२९ अशी एकूण ४२ हजार ३३३ वर पोहचली आहे.

माजी नगरसेवकाचा करोनाने मृत्यू

माजी नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते बाळु बांते यांचे करोनाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे.

शासकीय रुग्णालयांकडूनही टाळाटाळ

सध्या मेडिकल, मेयो, एम्स या शासकीय रुग्णालयांचा ताण वाढला आहे. या रुग्णालयांतही ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असलेल्या खाटा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. दोन्ही रुग्णालयांत  रुग्णांना दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

जिल्हाधिकारी रुग्णालयात

करोनाची बाधा झालेले पण गृहविलगीकरणात असलेले  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आज पुढील उपचारासाठी रुग्णालयात  दाखल झाले. त्यांची प्रकृत्ती स्थिर आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विदर्भातील

(१५ सप्टेंबर) मृत्यू

जिल्हा                   मृत्यू

नागपूर                      ४८

वर्धा                            ०७

चंद्रपूर                         ०६

गडचिरोली                   ००

यवतमाळ                    ०५

अमरावती                    ०५

अकोला                        ०३

बुलढाणा                       ०२

वाशीम                          ००

गोंदिया                         ०४

भंडारा                          ०३

एकूण                           ८३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:32 am

Web Title: 48 covid 19 patients die in 24 hours in nagpur zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 यूपीएससी परीक्षार्थीच्या नियोजनाबाबत एसटी विभाग संभ्रमात
2 उपचार शुल्कावरून ‘आयएमए’-शासनात संघर्षांचे संकेत
3 कर्जाचा अर्ज फेटाळणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे
Just Now!
X