२४ तासांत ८१ मृत्यू; ४,९०० नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ८१ करोना रुग्णांचा मृत्यू तर ४ हजार ९०० नवीन रुग्णांची भर पडली. दरम्यान,  शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात दिवसभरात झालेल्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या करोनाबाधितांचे प्रमाण दुप्पट आहे.

नागपुरात २४ तासांत १५ हजार ६३७, ग्रामीणला ६ हजार २४१ अशा जिल्ह्य़ात एकूण २१ हजार ८७८  चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहेत. परंतु बुधवारी तपासलेल्या जिल्ह्य़ातील २१ हजार ६१२ नमुन्यांत ४ हजार ९०० रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यानुसार सकारात्मक अहवालाचे प्रमाण २२.६७ टक्के नोंदवले गेले. बुधवारी शहरात तपासलेल्या नमुन्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण १७.७८ टक्के आढळले. परंतु, ग्रामीणला हे प्रमाण तब्बल ३४.३२ टक्के नोंदवले गेले. याशिवाय दिवसभरात शहरात करोनामुळे ४७, ग्रामीण २१, जिल्ह्य़ाबाहेरील १३ असे एकूण ८१ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ७८०, ग्रामीण २ हजार १, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार १२८ अशी एकूण ७ हजार ९०९ रुग्णांवर पोहचली आहे.

लसीकरण आढावा

पहिली मात्रा

आरोग्य सेवक       – ४३५७९

फ्रंट लाईन वर्कर      – ४७६२०

१८ अधिक वयोगट –     ३१०६

४५ अधिक  वयोगट  – १,०४,०६१

४५ अधिक कोमार्बिड     – ७६२०२

६० अधिक सर्व नागरिक – १,६१,३८९

एकूण  –      ४,३५,९५७

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक           – २०,७०३

फ्रंट लाईन वर्कर       –  १३,१०४

४५ अधिक वयोगट     –  १२,८३४

४५ अधिक कोमार्बिड  –  १०७२२

६० अधिक सर्व नागरिक –  ४६४७४

एकूण –  १,०३,८३७

संपूर्ण लसीकरण एकूण – ५,३९,७९४

आयुक्तांकडून नियंत्रण कक्षाची पाहणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे केंद्रीय नियंत्रण कक्ष महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळ्यावर सुरू करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी नियंत्रण कक्षाची पाहणी केली. मुख्यालयात सुरू करण्यात आलेला नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. येथे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन भागामध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध असेल. आता कोणत्याही शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात (८० टक्के क्षमतेत) अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. नियंत्रण  कक्षामधून खाट उपलब्ध झाल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येईल.

लसीकरण सुरू राहणार

राज्य शासनाच्या कोटय़ातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे एकूण ९६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्रावर कोव्हॅक्सिन, इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय येथे २ केंद्र व अ.भा. आयुर्विज्ञान संस्थामध्ये ४ येथे कोविशिल्ड याप्रमाणे एकूण ९६ शासकीय व महापालिकेच्या केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या मात्रेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या नागरिकांची दुसरी मात्रा शिल्लक आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी आता ६ केंद्र सुरू आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिन  लसीकरण प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रू सर्वोदय मंडळ हॉल छाप्रूनगर व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल. त्याशिवाय पाचपावली सूतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा येथे कोविशिल्ड  लस देण्यात येईल.

खाटा, औषध, रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधा

*  शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटा मिळण्यासाठी :  ०७१२-२५६७०२१ / ७७७००११५३७ / ७७७००११४७२

*   औषधे व प्राणवायू मिळण्यासाठी  :  ०७१२-२५५१८६६ / ७७७००११९७४

*   रुग्णवाहिकेसाठी : ०७१२-२५५१४१७ / ९०९६१५९४७२

विदर्भात पुन्हा करोना मृत्यूची संख्या घटली!

विदर्भात सलग तीन ते चार दिवस करोनाचे मृत्यू कमी होत असतानाच बुधवारी अचानक मृत्यू पुन्हा अडीचशेच्या वर गेल्याने चिंता वाढली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा येथे २४ तासांत २०६ करोनाग्रस्तांचा मृत्यू नोंदवला गेला आहे. तर दिवसभरात १२ हजार ७५१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. विदर्भात ५ मे रोजी २५७ मृत्यू झाले होते. त्यापूर्वी ही संख्या कमी होत होती. त्यामुळे पुन्हा मृत्यू वाढल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली होती. परंतु ६ मे रोजी पुन्हा विदर्भात २०६ अशी कमी मृत्यूसंख्या आल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभरात नागपूर शहरात ४७, ग्रामीण २१, जिल्ह्य़ाबाहेरील १३, अशा एकूण जिल्ह्य़ात ८१ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३९.३२ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ४ हजार ९०० नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात १६ रुग्णांचा मृत्यू तर ५२७ रुग्ण, अमरावतीत २० मृत्यू तर १ हजार १८९ नवीन रुग्ण, चंद्रपूरला १५ मृत्यू तर १ हजार ५०५ रुग्ण, गडचिरोलीत ६ मृत्यू तर ५६२ रुग्ण, गोंदियात ८ मृत्यू तर ३९७ रुग्ण, यवतमाळला १६ मृत्यू तर ९१९ रुग्ण, वाशीमला ६ मृत्यू तर ४९६ रुग्ण, अकोल्यात ११ मृत्यू तर ६८० रुग्ण, बुलढाण्यात २ मृत्यू तर ६४१ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात २५ मृत्यू तर ९३५ नवीन रुग्ण आढळले.

सक्रिय रुग्णांची संख्या ६५ हजारांहून खाली

शहरात ३५ हजार ५८१, ग्रामीण २९ हजार १६ असे एकूण जिल्ह्य़ात ६४ हजार ५९७ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ८ हजार १२८ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर ५६ हजार ४६९ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.  जिल्ह्य़ात अनेक दिवसांनी सक्रिय रुग्णांची संख्या ६५ हजारांहून खाली आली आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ८३.४४ टक्यांवर

शहरात दिवसभऱ्यात ३ हजार ७४०, ग्रामीण २ हजार ५९८ असे एकूण ६ हजार ३३८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ७१ हजार ९२०, ग्रामीण ९३ हजार ४१२ अशी एकूण ३ लाख ६५ हजार ३३२ व्यक्तींवर पोहचली. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक येत आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचेही प्रमाण सुधारून ८३.४४ टक्क्यांवर आले आहे.