अभिजीत खोपडेंसह खुनाच्या प्रयत्नातील आरोपी फरार

शुभम महाकाळकर हत्याकांडातील गुन्हा दाखल असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजीतसह इतर आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. ते हाती लागले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुख्य आरोपी प्रमोद लिबन बरम्रोतवार याला न्यायालयाने शुक्रवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

[jwplayer PuSvtqP8]

अभिजीत खोपडे हा रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अक्षय खंडारे आणि चार मित्रांसह शंकरनगर चौकातील क्लाऊड सेवन बारमध्ये गेला होता. दारू प्राशन केल्यावर त्यांच्या बिलामध्ये सूट देण्यावरून बारमालक सनी उर्फ सावन प्रमोद बरम्रोतवार याच्याशी त्यांनी वाद घातला. बाचाबाचीनंतर अभिजीतने मित्रासह बारमध्ये तोडफोड केली. सनी बरम्रोतवार याच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर अभिजीत खोपडे आणि त्याचे मित्र लक्ष्मीभुवन चौकात गेले. तेथून त्यांनी लहान भाऊ रोहित खोपडे, शुभम महाकाळकर आणि अन्य चार ते पाच मित्रांना फोन करून बोलावले. त्यानंतर पुन्हा बारमध्ये गेले आणि बारमधील वेटर, व्यवस्थापक आणि मालकाला मारहाण केली आणि नंतर सर्वजण लक्ष्मीभुवन चौकात जणू काहीच घडले नाही असे भासवत गप्पा करत थांबले.

दरम्यान, मुलांना मारहाण केल्याची माहिती बार व्यवस्थापक सिद्धार्थ पाटीलने सनीचे वडील प्रमोद बरम्रोतवार आणि लहान भाऊ शोभीतला दिली. ते काही साथीदारांसह बारमध्ये पोहोचले. त्यांना सनी रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. प्रमोद आणि मुलगा शोभीत, भालेकर, पराग यादव गोगावले, कपिल राजेश अरखेल यांच्यासह कारने तलवार, चाकू आणि अन्य शस्त्रासह लक्ष्मीभुवन चौकात गेले. त्यांचा अवतार पाहून अभिजीत आणि रोहित खोपडे या दोघांनी पळ काढला. त्यांच्या तावडीत शुभम महाकाळकर सापडला.

आरोपींनी शुभमवर तब्बल १७ घाव करीत त्याची हत्या केली. आरोपींनी शुभमला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर तीनही कारची तोडफोड करून तेथून पळ काढला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अक्षय खंडारेच्या तक्रारीवरून प्रमोद व त्याचा मुलगा शोभीत बारम्रोतवार व अन्य सात ते आठ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे.

[jwplayer y8Pn2zMM]