आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीसह पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत  शहरात तब्बल ५० उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुढे ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

उपराजधानीची भौगोलिक स्थिती बघितली तर प्रत्येक वर्षी मे महिन्यात येथील तापमान ४५ ते ४६ अंशावर जाते. शहरात काही दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे तापमानात घट झाली आहे, परंतु त्यानंतर पुन्हा उन्ह तापत आहे. उकाडय़ामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वत्र तापासह गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयो, आयसोलेशन रुग्णालयातच गेल्या दहा दिवसांत दीडशेहून जास्त गॅस्ट्रो वा त्यासदृश्य आजारांच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

या रुग्णांना उन्हापासून त्रास झाल्यास त्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे  होणे अपेक्षित आहे, परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ ५० रुग्णांचीच नोंद आहे. हेही रुग्ण सर्व खासगी व शासकीय रुग्णालय मिळून आहे. त्यामुळे उष्माघाताच्या अचूक आकडेवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, महापालिकेकडून शहरात नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी हिट अ‍ॅक्शन प्लान राबवला जात आहे, परंतु शहराच्या अनेक भागात आवश्यक प्रमाणात नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्याऊही नसल्याने या आराखडय़ाच्या  अंमलबजावणीवर प्रश्न निर्माण झाले आहे. सध्या शहराचे तापमान ४२.२ अंशावर गेले आहे.  येत्या काही दिवसांत त्यात वाढ  होण्याची शक्यता असल्याने रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक

  • जास्त पाणी पिणे
  • डोक्यावर रुमाल बांधा
  • एसी/ कुलरमधून लगेच उन्हात जाऊ नका
  • दही ताकाचा आहारात समावेश करा