टंचाई कशी संपणार? शुद्धीकरणावरील खर्च व्यर्थ

२४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी एकीकडे शेकडो कोटी रुपये खर्च करायचे, कच्च्या पाण्यावर प्रक्रिया करण्यावर वेगळा खर्च करायचा मात्र, पुरवठा करणारी यंत्रणा बळकट करायची नाही, त्यामुळे शहराला मिळणाऱ्या शुद्ध पाण्यापैकी ५० टक्के पाणी हे गळतीमुळे मातीत जात असल्याचे उघडकीस आले आहे. खुद्द पालकमंत्र्यांनीच ही बाब मान्य करून गळतीचे प्रमाण १५-२० टक्के खाली आणण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले असून हे न केल्यास नागरिकांना पाणी पुरवठा करणे भविष्यात शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरात बाराही महिने कोणत्या ना कोणत्या भागात पाणीटंचाईला नागरिकांना सामोर जावे लागते. त्याला कारण उपलब्ध पाणीसाठय़ातून होणाऱ्या पुरवठय़ातील त्रुटी ही बाब आहे. कोटय़ावधी रुपये खर्च करून कच्च्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, नागरिकांच्या घरापर्यंत तसेच जलाशयातून जलकुंभापर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वी जलवाहिन्यांना असलेल्या गळतीमुळे निम्मे पाणी मातीत जाते, असे महापालिकेच्या आकडेवारीतूनच स्पष्ट झाले असून आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या नगरभवनातील बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनीच ५० टक्के पाणी गळती होत असल्याची बाब मान्य केली.

सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामळे जलाशयातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच-तोतलाडोह धरणात अत्यंत कमी  साठय़ामुळे शहरासाठीच्या पाण्याचे आरक्षण कमी झाले तर पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात गुरुवारी आढावा बैठक झाली.

त्यात त्यांनी भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी नैसर्गिक जलस्रोतांची दुरुस्ती आणि पाण्याचा वापर याबद्दल नियोजनाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील दोन महिने जर  निसर्गाने साथ दिली नाही तर शहर व जिल्ह्य़ात  ५० टक्के पाणी कपात करावी लागणारआहे, असे त्यांनी स्पष्ट  केले.

पेच जलाशयात फक्त २८ टक्के साठा

दिवसेंदिवस होणारा कमी पाऊस आणि मध्यप्रदेशातील चौराई येथे झालेल्या धरणामुळे जिल्ह्य़ातील पेंच जलाशयात कमी पाणीसाठा आहे. यंदा फक्त २८ टक्के पाणी साठा आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि होणारी गळती लक्षात घेता पाणी संरक्षण, संवर्धन आणि बचतीचा आराखडा तयार करा, गळतीचे प्रमाण १५ टक्क्यापर्यंत खाली आणा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

सध्या होणारा पाणीपुरवठा (द.ल.घ.मी)

कन्हान -६५.७१

पेंच नवेगाव -११२

तात्पुरती व्यवस्था -७८

जलशुद्धीकरण केंद्र- ७८६

पाण्याची उचल -६४५

जलकुंभातील साठा -१९८

झोननिहाय पाणी गळती

१) लक्ष्मीनगर -२५ टक्के

२) धरमपेठ – ३५ टक्के

३) हनुमाननगर -२५ टक्के

४) नेहरूनगर – ३० टक्के

५) धंतोली – ५० टक्के

६) सतरंजीपुरा – ७० टक्के

७)आशीनगर -६५ टक्के

८) गांधीबाग – ७० टक्के

९) मंगळवारी – ५० टक्के

१०) एकूण गळती – ५० टक्के

या उपाययोजना करा

*     अवैध कनेक्शन बंद करणे

*     पाण्याचे नवीन स्रोत शोधणे

*     जुने स्रोत बळकट करणे

*     पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई

पेंच-तोतलाडोह येथील पाणीसाठा कमी झाला तर त्याचा पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणावर परिणाम होऊ  शकतो. सध्या शहरातील जलवाहिन्यांतून होणाऱ्या गळतीचे प्रमाण ५० टक्के आहे. हे प्रमाण १५ ते २० टक्के खाली आणले तरच पाणीटंचाईचा सामना करता येईल.

– चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर</p>