माहिती अधिकारात बाब उघड

नागपूर :  बँक ऑफ महाराष्ट्रकडून व्यवसायासाठी मुद्रा कर्ज घेणाऱ्या ३६ हजारांवर ग्राहकांनी गेल्या आर्थिक वर्षभरात तब्बल ५२९ कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकत्रे अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधी दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रने एकूण ४ लाख ७६ हजार १०१ ग्राहकांना मुद्रा कर्ज वाटप केले. त्याची मूळ रक्कम २,४१०.८३ कोटी इतकी आहे. यातील ३६ हजारांवर ग्राहकांनी ५२९ कोटी रुपये थकवले आहेत. या कालावधी दरम्यान ६ लाख ९० हजार ३७७ ग्राहकांनी जनधन योजनेत खाते उघडले असून यामध्ये २५२.६५ कोटी रुपये आहेत. तसेच फसवणुकीची १५७ प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये ३,३९१ कोटींची रक्कम गुंतली असून कर्मचाऱ्यांमुळे २ कोटी ३७ लाखांची फसवणूक झाली आहे. तसेच या कालावधीत १ हजार ७६ बनावट नोटा बँकेला प्राप्त झाल्या. यादरम्यान रिझर्व बँकेकडे या बँकेसंदर्भात ३२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ग्राहकांनीही त्यांना आलेल्या विविध अडचणींबाबत बँकेकडे ८ हजार ७३९ तक्रारी केल्याचे या माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.