प्रशासनातील विविध विभागांचे एकमेकांकडे बोट

अकोला, अमरावती बुलढाणा जिल्ह्यच्या सीमेवरील दगडी बांधणीचा शिवकालीन मठ हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. येथून वाहणाऱ्या वान नदीत बुडून १५ वर्षांत ५२ जणांचा बळी गेल्याची माहिती वान फाऊंडेशनला माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. मात्र, सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात प्रशासनातील विविध विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने या पर्यटनस्थळी आणखी किती बळी जाणार, याबाबत भीती व्यक्त केली जात आहे.

सातपुडा पर्वत आणि वान अभयारण्याच्या पायथ्याशी व वान नदीच्या किनाऱ्यावर दगडी बांधणीचा शिवकालीन मठ आहे. अकोला, अमरावती व बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यच्या सीमा त्याठिकाणी एकत्र येतात. अभयारण्य, पर्वत आणि नदी यामुळे मठाच्या सभोवताली सुंदर निसर्गसौंदर्य असल्याने पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. याशिवाय वर्षांतून पाच ते सहा उत्सव याठिकाणी होतात. मात्र, या पर्यटनस्थळाची सुरक्षा व्यवस्था शून्य आहे. येथील निसर्गसौंदर्य पाहून पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. वान नदीतील मामा-भाचा डोहात मृत्यूची भयकथा भयंकर आहे. या डोहाला अनेक दगडी कपारी आहेत आणि एकदा पर्यटक याठिकाणी अडकला तर थेट मृतदेह हाती लागतो, असाच अनुभव आहे. अलीकडच्या दोन महिन्यात याठिकाणी चार जणांचा बळी गेला. वर्षांतून किमान दहा बळी जातात.

पालकमंत्र्यांच्या आदेशालाही हरताळ

या पर्यटनस्थळाला सुरक्षा व्यवस्था हवी म्हणून गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी काम करणाऱ्या वान फाऊंडेशनने सातत्याने लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला साकडे घातले. गेल्यावर्षी गृहराज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष पर्यटनस्थळावर नेले. त्यांनी याठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले. मात्र, तब्बल एक वर्ष होऊनही  सुरक्षा व्यवस्थेचे कोणतेही काम याठिकाणी झाले नाही. पालकमंत्र्यांनी यासंदर्भात समिती स्थापन करण्यास सांगितले होते. ही समिती देखील स्थापन झाली नाही. वन, महसूल आणि पाटबंधारे खाते एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे.

प्रक्रिया अतिशय संथ गतीने

गेल्या आठवडय़ात आम्ही केलेल्या तक्रारीनंतर अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता याठिकाणी येऊन गेले. तसेच विशाखापट्टणमचा एक चमू याठिकाणी पाहणीसाठी आला. मात्र, ही सर्व प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे. माहिती अधिकारात २५ वर्षांतील मृत्यूंच्या संख्येबाबतची माहिती मागितली तर १५ वर्षांचीच देण्यात आली. स्थानिकांच्या माहितीनुसार २५ वर्षांत तब्बल १७० पर्यटकांचे बळी याठिकाणी गेले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासन आणखी बळींची वाट तर पाहात नाही ना, अशी शंका वान फाऊंडेशनचे उत्तम नळकांडे यांनी व्यक्त केली आहे.