आजपर्यंतच्या बळींची संख्या २७ वर; दिवसभरात नवीन ५२ बाधितांची भर

नागपूर : शहरात आज मंगळवारी सकाळी भांडेवाडीतील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंत शहरात या आजाराने दगावणाऱ्यांची संख्या २७ वर पोहचली आहे. याशिवाय दिवसभरात नवीन ५२ बाधितांची भर पडली असून आजपर्यंत आढळलेल्या करोनाग्रस्तांची संख्या आता  १,८६५ झाली आहे.

भांडेवाडी येथील व्यक्तीला ५ जुलैला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला दारूचे व्यसन होते, आधी श्वसन यंत्रणेचा क्षयरोगही होता. अनेक दिवसांपासून त्यावर श्वसनाशी संबंधित उपचार सुरू होते. या आजारांमुळे त्याचे फुफ्फुस निकामी होत असल्याचा इशारा डॉक्टरांकडून देण्यात आला होता. त्यातच  करोनाची लक्षणे दिसल्याने त्याची चाचणी केली असता त्याला करोना असल्याचे निदान झाले.  उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी सकाळी  मृत्यू झाला. दरम्यान, शहरात दिवसभरात नवीन ५२ बाधितांची भर पडली. त्यात गोपालनगर १, हजारी पहाड ४, अजनी २, सोमलवाडा १, धरमपेठ टांगा स्टँड १, जुनी मंगळवारी १, ताजबाग १, बजरिया १, नारा १, लकडगंज १,  बुलढाणा १, अमरावती २, कुही १, व्हीएनआयटी  विलगीकरण केंद्रातील ७ जणांचा समावेश आहे. इतरही काही भागात नवीन बाधित आढळले आहेत.

कारागृहाशी संबंधित आणखी २३ बाधित

मध्यवर्ती कारागृहाशी संबंधित आणखी २३ जणांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला  आहे. या सगळ्यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजीन तपासण्या करण्यात आल्या होत्या. या तपासणीत केवळ ४५ मिनिटांतच निदान होते. ही तपासणी कमी खर्चाची असून सुरुवातीला या तपासणीत सकारात्मक आलेल्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेने आरटी पीसीआरवरही तपासले होते. दोन्ही पद्धतीने बाधितांचा अहवाल सारखाच होता.

एकाच कुटुंबातील ११ जणांना करोना

काटोलमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांना करोनाची बाधा असल्याचे पुढे आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा प्रवासाचा इतिहास आहे. त्यातूनच इतरांना संक्रमण झाल्याची शंका आरोग्य विभागाकडून  व्यक्त होत आहे.

आणखी सहा परिसर प्रतिबंधित

आज मंगळवारी हनुमाननगर झोनतंर्गत नरसाळा भागातील नीलकमल नगर, नेहरूनगर झोनमधील आशीर्वादनगर, गांधीबाग झोनअंतर्गत लोधीपुरा हज हाऊस परिसर, हनुमाननगर झोनमध्ये रेशीमबाग परिसरातील पुष्पांजली अपार्टमेंट, हनुमाननगर झोनमध्ये महात्मा फुले नगर, सतरंजीपुरा झोनतंर्गत प्रेमनगर झेंडा चौक, मेहंदीबाग रोड बिनाकी  आणि हनुमाननगरातील भोले बाबानगर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. येथील ४५ लोकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले, तर अनेक लोकांना घरीच विलगीकरणात  राहून त्यांचा परिसर व इमारत बंद करण्यात आले आहे.

दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह तिघे करोनाबाधित

विशेष शाखेतील महिला पोलीस निरीक्षक करोनाबाधित आढल्यानंतर विशेष शाखेतील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, चालक व आर्थिक गुन्हेशाखेतील एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक करोनाबाधित आढळून आले. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष शाखा व आर्थिक गुन्हेशाखेतील करोनाबाधितांची संख्या आता चार झाली आहे.

करोनामुक्तांची संख्या चौदाशेच्या उंबरठय़ावर

आज मेयोतून ३, एम्समधून २ तर मेडिकलमधूनही काही जण करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची  संख्या १,३९० हून पुढे गेली आहे.