शहराची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे सुरू असताना पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीने येत्या तीन महिन्यात उपराजधानीत ५५ ग्रीन बस दाखल होणार आहेत. राज्य सरकारने या संदर्भात संबंधीत प्रस्तावावर निर्णय घेऊन महापालिकेला पत्र दिले असून, निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षी २०१६ मध्ये शहरातील रस्त्यांवर ग्रीन बस धावणार आहे. स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीच्या अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असलेल्या आरामदायी ग्रीन बसमुळे लोकांनाही चांगली सुविधा मिळणार आहे.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिकेने इथेनॉलवर चालणारी पहिली वातानुकूलित आरामदायी बस प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच देशामध्ये नागपुरात सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी होता. महापौर प्रवीण दटके यांची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून, त्यांनी ग्रीन बसच्या संदर्भातील प्रस्तावावर निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
नागपुरात गेल्यावर्षी प्रायोगिक तत्वावर संविधान चौक ते खापरी या मार्गावर अशी बस सुरू करण्यात आली होती. आणखी ५५ बसेस येणार असल्यामुळे त्या कुठल्या मार्गाने धावणार या संदर्भात लवकरच आराखडा तयार केला जाणार आहे. बंगळुरूमध्ये ग्रीन बस तयार करण्याचे काम सुरू आहे.
वातानुकूलित आणि अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या या बसमध्ये ३७ लोकांची बसण्याची व्यवस्था असून, जवळपास १२ लोक उभे राहून प्रवास करू शकतील. दूरवस्था झालेल्या स्टारबसमधून प्रवास करण्याऐवजी पर्यावरणीयदृष्टय़ा अधिक योग्य असलेल्या बसने प्रवास करणे अधिक सोयीचे असल्यामुळे लोकांकडून ग्रीन बसची मागणी होऊ लागली. त्यामुळे आता नागरिकांना फार दिवस वाट पहावी लागणार नाही. येत्या तीन महिन्यात ज्या भागात स्टार बस धावत नाही किंवा शहराच्या बाहेर असलेल्या अभियाित्रकी किंवा वैद्यकीय महाविद्यालय, खासगी शाळा आहेत अशा मार्गावर ही बस धावणार असून त्या संदर्भात मार्ग ठरविण्यात येणार आहे.
या संदर्भात परिवहन समितीचे सभापती बंडू राऊत यांनी सांगितले. राज्य सरकारने नव्याने येणाऱ्या ५५ ग्रीन बससाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात शहरातील विविध भागात इथेनॉलवर चालणाऱ्या बस धावतील. या ५५ बसेसला लागणारे इथेनॉलचा साठा आपल्याकडे उपलब्ध असून त्याची कमतरता भासणार नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.