‘अल्ट्राफिट जिम’च्या अभ्यासातील तथ्य; सडपातळ आणि सुंदर दिसण्याची धडपड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपराजधानीत जिममध्ये व्यायाम करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. पूर्वी या गटातील महिलांचा कल हलक्या पद्धतीचे व्यायाम करण्याकडे असायचा, परंतु कमी वेळात स्लिम व सुंदर दिसता यावे, यासाठी आता शहरातील सुमारे ६० टक्के महिला अवघड व्यायामाला पसंती देत आहेत. अल्ट्राफिट जिमच्या अभ्यासात हे तथ्य समोर आले आहे.

अल्ट्राफिट जिममध्ये रोज व्यायामासाठी येणाऱ्या साठ महिलांचा पसंतीक्रम लक्षात घेतला असता आधी महिलांचा कल हलक्या पद्धतीच्या व्यायामाकडे होता. त्यामध्ये वेगवेगवेगळ्या मशीनवर चालणे, धावणे, सायकलिंग, दोरीवरच्या उडय़ा मारणे, लठ्ठपणा कमी करण्याशी संबंधित व्यायामांसह आरोग्याबाबतच्या विविध समस्या सोडवण्याशी संबंधित व्यायामाचा समावेश होता, परंतु हळूहळू हा कल बदलत गेला. कमी वेळेत शरीराचे वजन कमी करणे, विविध अवघड काम करण्यासाठी स्वत: ची ताकद वाढवणे, स्वत: च्या सुरक्षेसाठी सक्षम होणे, अशा कारणांमुळे ६० टक्के महिलांनी अवघड पद्धतीच्या म्हणजेच जड वजन उचलण्याशी संबंधित व्यायामांना प्राधान्य दिले. या व्यायामांमध्ये बायसेप्स, ट्रायसेप्सचा समावेश आहे.

आरोग्यासोबतच सुरेक्षेलाही प्राधान्य

सुंदर व स्लिम दिसणे, स्वत: चे रक्षण करणे यासाठी महिला जिममध्ये अवघड व्यायामाकडे वळत असल्याचे आमच्या निरीक्षणात पुढे आले आहे. महिलांनी नित्याने जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या देखरेखीत व्यायाम केल्यास त्यांना लठ्ठपणा, पाठ, मानेचा त्रास आदींपासून दूर राहता येते.

– अनिरुद्ध आखरे, अल्ट्राफिट जिम, नागपूर</p>

आधुनिक उपकरणांचा वापर

उपराजधानीतील विविध जिममध्ये आधुनिक उपकरणांचा वापर  वाढत आहे. त्यात कार्डिओ मशीन, पॉवर लिफ्टिंग, ब्डॉमिनल मशीन, लिव्हरेज, इंक्लाईन प्रेस, बारजॉगर, बुलवर्कर, डंबेल्स, स्टनिंग सायकल आदी साधनांचा समावेश आहे. या उपकरणांनुसारच जिममध्ये शुल्क देखील आकारले जाते. यात तीनशे रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंत महिन्याचे शुल्क आकारण्यात येते. काही ठिकाणी वार्षिक पॅकेज देखील उपलब्ध असते.

नोकरदार महिला जास्त दक्ष

नोकरी करताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच अनेक महिलांना बसून काम करावे लागत असल्याने पाठीच्या व गुडघ्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे नोकरदार महिला आता आपल्या आरोग्याबाबत जास्त दक्ष होत असून निरोगी राहण्यासाठी या महिला जिमकडे वळत असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60 percent of women have a hard type exercising
First published on: 07-09-2018 at 04:33 IST