News Flash

बँकेचे कर्ज फेडण्यात दृष्टिहीनांची डोळस दृष्टी!

या संदर्भात धरमपेठच्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या स्टाफ युनियनचे अध्यक्ष सत्यशील रेवतकर म्हणाले

प्रातिनिधीक छायाचिक

सामान्यत: कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड न करण्याची मानसिकता काही उद्योजक, सधन शेतकरी किंवा नेत्यांमध्ये दिसून येते. मात्र, बँक ऑफ इंडियाने मदतीचा हात पुढे करून ६१ दृष्टिहीनांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आणि त्यांनी दिलेल्या मदतीची बुज राखत नियमित कर्जफेड करीत असल्याने बँकेनेही समाधान व्यक्त केले.
अनेक बँकांचे कर्ज बुडवून परागंदा झालेला किंगफिशरचा मालक विजय मल्या असो की, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबरोबर त्याचा लाभ घ्यायला पुढे सरसावणारे नेते असोत, त्यांच्या तुलनेत जगण्याचे प्रश्न भेडसवणाऱ्या दृष्टिहीनांना मदतीची भीक मागण्याशिवाय पर्याय नसतो. शिक्षण किंवा नोकऱ्यांमध्ये ते फार पिछाडीवर आहेत. कारण, उच्चशिक्षणासाठी मदत करतील, अशी साधने त्यांच्याकडे नाहीत. त्यातही काही दिव्यांग व दृष्टिहीन अभावांवर मात करून शिक्षण घेतात. मात्र, त्यांना नोकऱ्यांमधील तीन टक्के आरक्षण मिळत नाही. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही नोकऱ्यांमधील त्यांचे आरक्षण अद्याप भरलेले नाही. दृष्टिहीन व्यक्ती नेहमी आम्हाला ‘भीक नको संधी हवी’, असे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला बँक ऑफ इंडियाने सकारात्मक प्रतिसाद देत १ ऑक्टोबर २०१५ ते १ जुलै २०१६ पर्यंत ६१ दृष्टिहीनांना कर्ज पुरवठा करून त्यांना रोजगारक्षम बनवले.
या संदर्भात धरमपेठच्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या स्टाफ युनियनचे अध्यक्ष सत्यशील रेवतकर म्हणाले, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक चंद्रकांत पोपेरे यांच्या नेतृत्वाखाली कर्ज वाटप सुरू असून गेल्या आठ महिन्यात ६१ दृष्टिहीनांना आम्ही केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वाटप केले. गेल्या २००१ पासून राष्ट्रीय दृष्टिहीन संघाबरोबर (एनएफबी) काम करीत आहे. त्यावेळी ‘डिफरेन्शिल रेट ऑफ इंटरेस्ट’(डीआरआय) या योजनेंतर्गत १५ हजार रुपयांचे कर्ज देण्याची तरतूद होती. त्यावेळी बी.जी. कामत आमचे व्यवस्थापक होते. बँकेचा स्थापना दिन ७ सप्टेंबरचे औचित्य साधून कामत म्हणाले, असे काहीतरी आपण काम करायला हवे जेणेकरून ते कायम स्मरणात राहील. आम्ही कामाला लागलो आणि एनएफबीचे सरचिटणीस रेवाराम टेंभुर्णीकर यांच्या मदतीने डीआरआय अंतर्गत ४२ दृष्टिहीनांना कर्ज वाटप केले. त्यातील ३८ लोकांनी ते परत केले. त्यानंतर आलेल्या पोपेरे यांच्या नेतृत्वाखाली मुद्रा योजनेंतर्गत ५० हजारांपर्यंत कर्ज वाटप केले आहे. येत्या ७ सप्टेंबपर्यंत ११० दृष्टिहीनांना कर्ज वाटप करण्याचा पण केला आहे.
या संदर्भात एनएफबीचे सरचिटणीस टेंभुर्णीकर म्हणाले, ९० टक्के दृष्टिहीन कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर खेळणी विकण्यासाठी, पाण्याचे पाऊच विकण्यासाठी, कार वॉशिंग करणाऱ्या दृष्टिहीनांनाही कर्ज वाटप करण्यात आले आहे. ब्रेलचे कागद मुंबई आणि बंगळुरूला मिळतात. काही दृष्टिहीनांनी तेथून कागद आणून येथे ते विकण्याचे काम सुरू केले आहे. सुपारी कातरून ती पानटपरीला पुरवण्याचे काम एका तरुणीने सुरू केले असून फोटोकॉपी किंवा इतर स्टेशनरी विकण्याचे दुकानही काहींनी सुरू केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2016 12:58 am

Web Title: 61 blind pay regular loan installment taken for business
Next Stories
1 पाणीपट्टी थकबाकी राजकारणात अडकली!
2 मंदीतही परिवहन विभागाला १,०५० कोटींनी उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट
3 शैक्षणिक मूल्यांकनास महाविद्यालयांकडून अल्प प्रतिसाद
Just Now!
X