वैद्यकीय शिक्षण खात्याचा अहवाल

नागपूर : आजपर्यंत राज्यभरात सर्वाधिक करोना चाचण्या शासकीय प्रयोगशाळेत झाल्या असून तेथे ६१ टक्के चाचण्या झाल्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालातून पुढे आले आहे.

राज्यात मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाल्यावर मुंबई, पुणे, नागपूरसह इतरत्र बोटावर मोजण्या इतक्याच शासकीय व खासगी प्रयोगशाळा होत्या. त्यानंतर शासनाने सर्वच जिल्ह्य़ांत शासकीय प्रयोगशाळा उभारण्यावर भर

दिला. सोबतच खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीसाठी परवानगी दिली. वैद्यकीय शिक्षण खात्याकडून रोज जारी होणाऱ्या अहवालानुसार, २४ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजतापर्यंत राज्यात ८४ लाख ४२ हजार ६८८ चाचण्या झाल्या.

एकूण चाचण्यांतील ६१.८४ टक्के म्हणजेच ५२ लाख २१ हजार ६२४ चाचण्या शासकीय प्रयोगशाळेत झाल्या. खासगी प्रयोगशाळांमध्ये ३८.१६ टक्के म्हणजेच ३२ लाख २१ हजार ६४ चाचण्या झाल्या.

शासकीय प्रयोगशाळेत झालेल्या एकूण चाचण्यांतील १७.२३ टक्के म्हणजेच ८ लाख ९९ हजार ७८९ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले.  खासगी प्रयोगशाळेत १९.९२ टक्के म्हणजेच १६ लाख ८१ हजार ५८० रुग्णांचे अहवाल करोनाबाधित आले.

*राज्यातील एकूण शासकीय प्रयोगशाळेत १७.२३ टक्के, खासगी प्रयोगशाळेत १९.९२ टक्के तर दोन्ही प्रयोगशाळेतील नमुने एकत्र केल्यास सरासरी १९.९२ टक्के रुग्णांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत.

*नागपूर जिल्ह्य़ात २३ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत ५ लाख ९४ हजार १७७  चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १५.६० टक्के म्हणजेच ९३ हजार ५५ रुग्णांचे अहवाल करोनाबाधित आले. राज्याच्या तुलनेत नागपुरात हे प्रमाण कमी आहे.