* स्थानिक समित्यांच्या निष्क्रियतेचा फटका  * महापालिकेचा आरोग्य विभाग अनभिज्ञ
उपराजधानीत प्रत्येक वर्षी ६५० हून जास्त ‘ब्रेन डेड’ रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयांत आढळतात. परंतु नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे त्यांची नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती आहे. या रुग्णांना ‘ब्रेन डेड’ जाहीर करण्याकरिता शासनाने नियुक्त केलेल्या समित्या निष्क्रिय असल्यामुळे हा फटका बसत असून त्यामुळे हे मानवी अवयव रुग्णांना जीवदान न देता वाया जात आहेत.
‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणाकरिता मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून केला जातो. त्याकरिता प्रत्येक वर्षी जाहिरातीसह विविध उपक्रमांवर कोटय़वधींचा खर्चही होतो. या उपक्रमांतर्गत एका ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या विविध अवयवांमुळे हृदय, किडनी, यकृत, नेत्र निकामी झालेल्यांना नवीन जीवन मिळू शकत असल्याचे सांगितले जाते. तेव्हा शासनाची ही योजना यशस्वी ठरावी म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी शेवटच्या व्यक्तीपर्यंत स्वत पोहचून चांगले काम करणे अपेक्षित आहे. परंतु उपराजधानीत शासकीय यंत्रणेतील अधिकारीच या उपक्रमाला हरताळ फासत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
नागपुरात वर्षभरात ६५० हून जास्त ‘ब्रेन डेड’ रुग्ण असतानाही त्यांचे अवयव रुग्णाच्या मृत्यूनंतर वाया जात आहेत. कायद्यानुसार कोणत्याही मानवाच्या किडनीसह विविध अवयव प्रत्यारोपणाकरिता शासनाकडून राज्य, विभाग, जिल्हा स्तरीय समित्या नियुक्त केल्या आहेत.
या समितीत वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृह विभागासह इतर शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने मंजुरी दिल्यावरच या प्रत्यारोपणास हिरवा कंदिल दाखवला जातो. समितीकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव प्रत्यारोपणाची तयारी दाखविल्यास दानदात्यांसह त्यांच्या कुटुंबीयांची इन कॅमेरा मुलाखत घेतली जाते.
याप्रसंगी समितीला हे अवयव पैशाच्या व्यवहारातून वा दबावातून दिले जात असल्याचा संशयही आल्यास तो प्रस्ताव फेटाळला जातो. भारतात ‘ब्रेन डेड’ रुग्णांचे प्रत्यारोपण वाढावे म्हणून केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेत सगळ्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात स्वतंत्र ब्रेन डेड समिती व जिल्ह्य़ातील इतर शासकीय व खाजगी रुग्णालयातील ‘ब्रेन डेड’ रुग्ण घोषित करण्याकरिता शल्य चिकित्सक व महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समितीचे आदेश दिले आहे.
त्यानुसार नागपूरात मेडिकल, मेयोसह इतर ब्रेन डेथ रुग्ण घोषित करण्याकरिता कागदावर काही समित्या असल्या तरी त्या निष्क्रिय असल्याने शहरात गेल्या काही वर्षांत
बोटावर मोजण्या इतक्याच रुग्णांना ‘ब्रेन डेड’ घोषित केले गेले आहे. त्यामुळे वर्षांला मोठय़ा प्रमाणवर ‘ब्रेन डेड’ रुग्ण असतानाही मृत्यूच्या दाढेत उभ्या असलेल्यांना त्याचा लाभ झाला आहे.

‘ब्रेन डेड’ घोषित करण्याची जबाबदारी समितीची
शासनाचे प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह जिल्ह्य़ातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील ‘ब्रेन डेड’ रुग्ण घोषित करण्याकरिता समित्या नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयांत रुग्ण शोधून त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित करण्याची जबाबदारी या समित्यांकडे असते. समितीकडे या रुग्णांच्या नातेवाईकांना समूपदेशन करून प्रत्यारोपणाकरिता प्रवृत्त करण्याचीही जबाबदारी असते. परंतु शहरात नियुक्त केलेल्या बहुतांश समित्या निष्क्रिय असल्याने शहरात याबाबतीत फारसे कामच होत नसल्याचे विदारक चित्र आहे.

सर्वाधिक ‘ब्रेन डेड’ रुग्ण अपघातातील
नागपूर शहरातील रस्त्यांवर १ जानेवारी २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान ८३८ अपघातात ६६६ रुग्ण जखमी तर उपचारादरम्यान ११८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर रिंग रोडवर १५० अपघातात २०७ जण जखमी तर ५६ मृत्यू नोंदवले गेले. सोबत शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पडून वा विविध कारणाने गंभीर जखमी होणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. हे रुग्ण शासकीय वा खासगी रुग्णालयात उपचाराकरिता गेल्यास अनेकांचे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे पुढे येते. वैद्यकीयदृष्टय़ा हे रुग्ण वाचू शकत नसल्याने त्यांच्या अवयव प्रत्यारोपणाने अनेकांना जीवदान मिळणे शक्य आहे. मेडिकल, मेयोसह लता मंगेशकर या वैद्यकीय महाविद्यालयात आठवडय़ात किमान १० रुग्ण आढळतात. इतरही कारणाने रुग्णांचे ‘ब्रेन डेड’ होत असले तरी संसर्गाच्या आजाराने झालेल्या रुग्णाचे अवयव वापरता येत नाही.