News Flash

पालिका निवडणुकीत ७० टक्क्यांवर मतदान, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष असणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

* आज मतमोजणी
*  नागपूर जिल्ह्य़ातील ९ नगराध्यक्ष व १८६ सदस्यांसाठी निवडणूक

जिल्ह्य़ातील ९ पालिका अध्यक्ष आणि १८६ सदस्यांच्या निवडीसाठी रविवारी जिल्ह्य़ात ७० टक्क्यांवर मतदान झाले. काटोलचा अपवाद वगळता जिल्ह्य़ात इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष असणार आहे. खुद्द फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतल्या, हे उल्लेखनीय.

जिल्ह्य़ातील कामठी (एकूण जागा ३३), उमरेड (२५), काटोल (२३), कळमेश्वर (१७), मोहपा (१७), रामटेक (१७), नरखेड (१७), खापा (१७) आणि सावनेर (२०) या पालिकेतील एकूण १८६ सदस्य आणि नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी रविवारी ३३१ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत १५ टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मतदानाला थोडी गती आली. ३.३० पर्यत ही सरासरी ४८.५१ पर्यंत पोहोचली होती. कामठीत ४४.९३ टक्के, उमरेडमध्ये ५१ टक्के, काटोलमध्ये ४६ टक्के, कळमेश्वरमध्ये ५८.२५ टक्के, मोहपा ६०.९० टक्के, रामटेक ४६.८ टक्के, नरखेड ४९.६ टक्के, खापा ४७.६१ टक्के आणि सावनेर ५१.१४ टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यावर संपूर्ण जिल्ह्य़ात सरासरी ७० टक्क्यांवर मतदानाची नोंद करण्यात आली. कळमेश्वरमध्ये ७५ टक्के, मोहप्यात ८५.९५ टक्के मतदान झाले, कामठीत ६०.१७, उमरेड  ७४.८७, मोहप्यात ८५.९६, तर रामटेकमध्ये ७०.२० टक्के मतदान झाले. इतर पालिकांची अंतिम आकडेवारी प्राप्त झालेली नव्हती.

कामठीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची, सावनेरमध्ये काँग्रेस आमदार सुनील केदार, उमरेडमध्ये काँग्रेस नेते व माजी मंत्री राजेंद्र मुळक, काटोलमध्ये राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख व भाजपचे विद्ममान आमदार डॉ. आशीष देशमुख यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जिल्हाभर सभा घेतल्या. सोमवारी प्रत्येक पालिकेच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2017 1:01 am

Web Title: 70 percent voting in nagpur municipal elections
Next Stories
1 भारतीय अ‍ॅनिमेशन निकृष्ट दर्जाचे -राऊत
2 नोटाबंदीनंतरची विरोधकांची विधाने हास्यास्पद
3 घोडाझरीला गेलेला नागपूरचा ट्रॅक्टर उलटून ४६ महिला जखमी
Just Now!
X