ठिकठिकाणी वृक्षारोपण केले

मोटारसायकलवरुन महिलांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे, पण मोपेडवरून असा प्रवास करणे जरा कठीण आहे. उपराजधानीतल्या तीन तरुणी आणि पन्नाशी ओलांडलेल्या दोन महिलांनी ही हिंमत दाखवली. नागपूर-जबलपूर-नागपूर असा तब्बल ७००-७५० किलोमीटरचा प्रवास त्यांनी मोपेडवरून केला. मार्गात त्यांना अडथळे आले. त्या पडल्याही, पण पुन्हा धर्य एकवटून त्यांनी प्रवास पूर्ण केलाच.

वनविकास महामंडळात वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या कल्पना चिंचखेडे यांची दुचाकी एकदा खराब झाली. ती दुरुस्त करताना मोपेडवरून भटकंतीचा विचार त्यांच्या मनात डोकावला. मैत्रिणींजवळ त्यांनी हा विचार बोलून दाखवला आणि त्या तयार झाल्या. सहा सप्टेंबरला सकाळी ६.३० वाजता या पाचही जणींचा ताफा जबलपूरच्या दिशेने रवाना झाला आणि सायंकाळी ७.२० ला २८० किलोमीटरचे अंतर पार करत त्या जबलपूरला पोहोचल्या. सुरुवातीचे २०० किलोमीटर त्यांना रस्त्याने साथ दिली, पण पुढचा ८० किलोमीटरचा प्रवास खडतर होता.

अंधार आणि पाऊस त्यातच रस्ता खराब असताना एका मोपेडवर असलेल्या आणि पन्नाशी ओलांडलेल्या दोघीजणी खाली पडल्या. मात्र, त्या पुन्हा मार्गाला लागल्या. जबलपूरच्या आसपासचा परिसरही त्यांनी दुचाकीने पालथा घातला. रस्ता माहिती नाही, ‘जीपीएस’ काम करत नाही, अशाही परिस्थितीत त्यांनी वाटेत दिसणाऱ्या माणसांना विचारत, रस्त्यावरचे फलक वाचत ही भ्रमंती पूर्ण केली.

नऊ सप्टेंबरला सकाळी सात वाजता त्यांनी जबलपूर सोडले. परतीच्या वेळी त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. जवळजवळ १०० किलोमीटर अधिकचा तो रस्ता असला तरीही यादरम्यान कोणतीही अडचण त्यांना आली नाही. जातानाच्यापेक्षा येतानाचा प्रवास अधिक सुखकर झाला. हा फक्त मोपेड प्रवास नव्हता तर प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी अनेक झाडांच्या बिया गोळा केल्या होत्या. त्याचे रोपणही त्यांनी या भटकंतीदरम्यान केले.

   पुढचा प्रवास यापेक्षाही लांबचा असेल

जंगल, पाऊस, अंधार आणि खडतर रस्ता अशा अनेक अडथळ्यांवर मात देत पहिलीच मोपेड भ्रमंती आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, पन्नाशी ओलांडलेल्या प्रज्ञा पांडे आणि चित्कला कुळकर्णी यांच्या उत्साह पाहून आम्हालाही स्फुरण चढले. पुढचा प्रवास हा यापेक्षाही लांब अंतराचा असेल आणि आमच्यासोबत अनेक तरुणी आणि महिला जुळतील.

– कल्पना चिंचखेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविकास महामंडळ

सहभागी महिला

*  कल्पना चिंचखेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविकास महामंडळ

*  वर्षां खारमटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, गोरेवाडा

*  श्वेता मेश्राम, पर्यावरण अभियंता, डीआरए कन्सल्टंट्स लिमिटेड

*  प्रज्ञा पांडे, इंग्रजीच्या प्राध्यापक, सिंधी, हिंदी महाविद्यालय

*  चित्कला कुलकर्णी, निसर्गप्रेमी, इचलकरंजी