News Flash

७१ टक्के करोनाबाधितांचे मृत्यू केवळ दीड महिन्यात!

नागपूर जिल्ह्य़ातील धक्कादायक स्थिती; मंगळवारी १ मृत्यू; १४८ नवीन बाधितांची भर

७१ टक्के करोनाबाधितांचे मृत्यू केवळ दीड महिन्यात!
संग्रहित छायाचित्र

नागपूर जिल्ह्य़ातील धक्कादायक स्थिती; मंगळवारी १ मृत्यू; १४८ नवीन बाधितांची भर

नागपूर : शहरातील मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये आजपर्यंत नोंदवलेल्या एकूण ३८ मृत्यूंपैकी तब्बल ७१ टक्के मृत्यू (२७ रुग्ण) केवळ दीड महिन्यातील असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दरम्यान, शहर आणि ग्रामीण भागात मंगळवारी दिवसभऱ्यात १४८ नवीन करोना बाधितांची भर पडली तर एकाचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला.

मेयो रुग्णालयात सोमवारी मध्यरात्री दगावलेला ८० वर्षीय करोना बाधित  मनिष नगर परिसरातील आहे. त्यांना उच्च रक्तदाब, मधूमेहासह इतरही काही आजार होते. प्रकृती खालावल्यावर त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले असता करोनाचे निदान झाले. हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाला.  शहरातील आजपर्यंत दगावलेल्या एकूण बाधितांची संख्या आता ३८ वर पोहचली आहे.   १ जूनपासून शहरात अचानक नवीन बाधित वाढण्यासह मृत्यूही वाढत गेले. त्यामुळे जून महिन्यात शहरात १४ मृत्यू तर १४ जुलैपर्यंत १३ मृत्यू नोंदवले गेले. केवळ दोन महिन्यात शहरातील मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये तब्बल २७ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यातच शहरात आजपर्यंत दगावलेल्या एकूण रुग्णांपैकी ५ जण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच दगावले होते. सुमारे पंधरा रुग्ण हे नागपूर बाहेरच्या जिल्ह्य़ातून अत्यवस्थ अवस्थेत उपचाराला आले होते.

झिंगाबाई टाकळीत रुग्ण वाढले

झिंगाबाई टाकळी परिसरातील जुन्या वस्तीत  दिवसभऱ्यात १ तर नवीन वस्तीत तब्बल १३ रुग्णांची नोंद झाली.  विनोबा भावे नगरात ४, खरबी रोड १, पारडी (भांडेवाडी ले- आऊट, समता नगर) १, भरतवाडा १, धम्मदीपनगर १, शक्तीमाता नगर (वाठोडा) ३, भगवान नगर १, रघुजी नगर २, गोकुलपेठ १, निलकमल सोसायटी (बेसा) १, भारत नगर (एपीएमसी मार्केट) १, भोला नगर (कांजी हाऊस) १, चंदन नगर १, दुबे नगर १, गांधी सागर महाल (एम्प्रेस मॉल जवळ) १, गांधीनगर (महाल) १, हजारी पहाड (वायूसेना) १, जुनी शुक्रवारी १, कुंदनलाल गुप्ता नगर १, मछली मार्केट (भोईपुरा) १, म्हाळगी नगर १, नाईक तलाव (बांगलादेश) १, नरसाळा १, न्यू सुभेदार ले- आऊट १, भांडे प्लॉट १ आणि इतरही भागात रुग्ण आढळले

गुंड संतोष आंबेकर, राजा गौसलाही करोना

कुख्यात गुंड संतोष आंबेकर व राजा गौस यांनाही करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मध्यवर्ती कारागृहातील रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.  यासंदर्भात कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आठ दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याचे सांगितले. राजा गौसला एक दिवस मेयोत दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा पूर्वेतिहास बघून ताबडतोब कारागृहातील रुग्णालयात वर्ग करण्यात आले. दुसरीकडे संतोष आंबेकरवर कारागृहाच्या आतच उपचार करण्यात आले. राजा गौस हा २०१३ पासून मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याने रोशन समरित याचा खून केला होता. त्यानंतर नंदनवन पोलिसांवर गोळीबार केला होता.  त्यानंतर मध्यवर्ती कारागृहातूनही तो पळून गेला होता. हा इतिहास बघता त्याच्यावर कारागृहातच उपचार सुरू आहेत. दुसरीकडे संतोष आंबेकरविरुद्ध खंडणी, बलात्कार, फसवणूक आदी स्वरुपाचे जवळपास ११ गुन्हे दाखल असून त्याला ऑक्टोबर २०१९ मध्ये अटक करण्यात आली.

करोनामुक्तांची संख्या सोळाशेच्या उंबरठय़ावर

रोज नवीन बाधितांची भर पडत असली तरी करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. दिवसभऱ्यात मेडिकल, मेयो, एम्समधून ४० जण करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आजपर्यंत या आजारावर मात करणाऱ्यांची संख्या थेट १,५८५ वर पोहचली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या साडेआठशे पार

मेडिकलमध्ये १४७ रुग्ण, मेयोत ११५, एम्समध्ये ५०, कामठीच्या रुग्णालयात ३२, खासगी रुग्णालयात २२, आमदार निवासातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये १९९, मध्यवर्ती कारागृहातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये १९२ रुग्ण दाखल आहेत. रात्री उशिरा आणखी काही रुग्ण दाखल होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शहरात प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ८८२ पर्यंत पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:43 am

Web Title: 71 percent of covid 19 patients die in just one and a half months zws 70
Next Stories
1 ‘हनिट्रॅप’ ध्वनीफितीची चौकशी करा
2 महाविद्यालयीन शिक्षणाबाबत सरकार उदासीन!
3 भाजपने राजकीय नाटय़ घडवल्याने नागपुरात करोनाचा उद्रेक!
Just Now!
X