स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ अ‍ॅनलायझर, टिन्ट मीटरने सज्ज

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : राज्याचा परिवहन विभाग रस्ता सुरक्षेबाबत सज्ज होणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध भागातील ७६ वायूवेग पथकांना ‘इंटरसेप्टर’ वाहने मिळणार आहेत. या वाहनांत लेझर स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ अ‍ॅनलायझर, टिन्ट मीटरची सोय असल्याने नियम मोडणाऱ्यांवर आरटीओच्या पथकांना तातडीने कारवाई करता येणार आहे.

रस्ता सुरक्षा निधीमधून परिवहन विभागाने ही सर्व वाहने खरेदी केली असून त्यात विविध उपकरणे लावली जाणार आहेत. त्यासाठी १३ कोटी ६८ लाखांचा खर्च आहे. ही स्कॉर्पियो एस ५ गटातील वाहने महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा या उत्पादकांकडून घेतली  आहेत. या वाहनांचे राज्यातील विविध आरटीओ कार्यालयातील वायूवेग पथकानुसार वाटपही करण्यात आल्याचा परिवहन विभागाचा दावा आहे. परंतु प्रत्यक्षात राज्यात ९२ वायूवेग पथके असताना ७६ पथकांनाच वाहने मिळाल्याने इतरांना जुन्याच वाहनाने पेट्रोलिंग करावे लागणार आहे.

दरम्यान, वाहनातील लेझर स्पीड गनमुळे रस्त्यांवरील अनियंत्रित वाहनाची गती जाणून घेता येईल.  कुणी मद्यपान करून वाहन चालवत असल्यास अल्कोहोल ब्रेथ अ‍ॅनलायझरने त्याला पकडता येईल. टिन्ट मीटरने कुणाच्या चारचाकी वाहनावरील काळी फिल्ड नियमानुसार की नियमबाह्य़ हे कळेल. त्यामुळे परिवहन विभागाच्या कारवाईतही पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. या सर्व वाहनांची तात्पुरती नोंदणी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. या विषयावर परिवहन उपआयुक्त (निरीक्षण) दिनकर मनवर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.  नागपूरचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी नागपूर शहराला २, पूर्व नागपूरला १ वाहन मिळणार असल्याचे मान्य केले.

कार्यालयनिहाय वाहनांचे वाटप असे..

मुंबई (मध्य), मुंबई (पश्चिम), मुंबई (पूर्व), बोरीवली या आरटीओ कार्यालयांना ७ वाहने, ठाणे, कल्याण, नवीन मुंबई, वसई कार्यालयांना ६ वाहने, पनवेल, पेण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कार्यालयांना ६ वाहने, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या कार्यालयांना ६ वाहने, पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज कार्यालयांना ९ वाहने, नाशिक, अहमदनगर, श्रीरामपूर, मालेगाव कार्यालयांना ७ वाहने, धुळे, जळगाव, नंदुरबार कार्यालयांना ५ वाहने, औरंगाबाद, जालना, बीड कार्यालयांना ५ वाहने, नांदेड, परभणी, हिंगोली कार्यालयांना ४ वाहने, लातूर, उस्मानाबाद, अंबेजोगाई कार्यालयांना ४ वाहने, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम कार्यालयांना ६ वाहने, नागपूर (शहर), वर्धा, नागपूर (पूर्व) कार्यालयांना ४ वाहने, नागपूर (ग्रामीण), गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा कार्यालयांना ५ वाहने, परिवहन आयुक्त कार्यालयाला २ वाहने देण्याचे निश्चित झाले आहे.