राष्ट्रीय वरिष्ठ जनस्वास्थ्य योजना, केंद्राकडून ४३७ कोटी मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतातील वृद्धांना अद्यावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागपूरसह देशातील ८ महत्वाच्या वैद्यकीय संस्थांमध्ये राष्ट्रीय वरिष्ठ जनस्वास्थ्य योजनांतर्गत ८ प्रादेशिक वैद्यकीय सेवा केंद्रे स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ४३७ कोटी रुपये मिळणार असल्याने या भागातील वृद्धांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळेल.

भारत हा सध्या तरुणांचा देश असला तरी काही वर्षांनंतर निश्चितच येथे वृद्धांची संख्या वाढणार आहे. बहुतांश वृद्धांमध्ये या वयात विविध आजारांचे प्रमाण वाढते. तो समाजाचा अविभाज्य अंग असला, तरी अनेक वर्षांपासून त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय समस्येकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले होते. नरेंद्र मोदी  सरकारने मात्र प्रथमच वृद्धांसाठी राष्ट्रीय वरिष्ठ जनस्वास्थ्य या अनोख्या योजनेवर काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत देशातील आठ शहरातील प्रमुख शासकीय वा सार्वजनिक वैद्यकीय संस्थांमध्ये प्रादेशिक वृद्ध वैद्यकीय सेवा केंद्रे स्थापन केली जाणार आहे. त्याचे एक केंद्र नागपूरमध्ये स्थापन करण्याचे निश्चित झाले आहे.

शहरातील हे केंद्र मध्य भारतातील महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील वृद्धांसाठी असेल. या केंद्रासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ४३७ कोटी रुपये दिले जाणार असून. त्यातील काही वाटा राज्य शासनाला उचलावा लागणार आहे. आठही संस्थांमध्ये वृद्धांसाठी स्वतंत्र बाह्य़रुग्ण विभागासह ३० हून जास्त खाटांच्या आंतररुग्ण विभागाची स्वतंत्र सोय, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, अटेंडन्टसह विविध मनुष्यबळ व साधने उपलब्ध केली जाणार आहेत. या केंद्रात वृद्धांसाठी अद्यावत स्वयंचलित खाटा, व्हेंटिलेटरसह विविध महागडी जागतिक दर्जाची उपकरणे राहणार असून सोबतच वृद्धांच्या विविध तपासण्यांसाठी येथे अद्यावत महागडी उपकरणेही उपलब्ध राहतील. या केंद्रासाठी नागपूरच्या मेडिकल व मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची नुकतीच केंद्र सरकारच्या एजेंसीकडून चाचपणी करण्यात आली. त्यात मेडिकल ही संस्था केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या देशातील २० प्राधान्यक्रम दिला जाणाऱ्या वैद्यकीय संस्थेच्या सूचित असल्याने त्याला योजनेकरिता प्राधान्य मिळाले आहे. त्यामुळे मेडिकलकडून नुकताच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव घेतला असून तो राज्य शासनाकडून केंद्राकडे जाणार आहे.

देशात १६ पदव्युत्तर जागा वाढणार -डॉ. निसवाडे

भारतात सध्या वृद्धांवरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. केंद्र सरकारने नागपूरच्या मेडिकलसह देशातील आठ संस्थांमध्ये प्रादेशिक वृद्ध वैद्यकीय केंद्र सुरू करण्याचे निश्चित केले आहे. या सगळ्या संस्थांमध्ये या केंद्रासोबत प्रत्येकी दोन, अशा एकूण १६ पदव्युत्तर जागांची वाढ होईल. त्यामुळे वृद्धांना अद्यावत उपचार मिळणे शक्य होईल, असे मत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.