विदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेल्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख (फ्लाय अ‍ॅश) नाममात्र दराने का होईना बेंगळुरु येथील एका कंपनीने खरेदी केली असून रेल्वेने ८ हजार टन राख तिथे पाठण्यात आली आहे.

औष्णिक वीज निर्मिती कारखान्यातून निघणारी राख ही एक मोठी समस्या आहे. ही राख परिसरातील लोकवस्तींसाठी धोकादायक ठरत आहे. यावर उपाय म्हणून तिचा उपयोग वीट तयार करण्यासाठी आणि रस्ते बांधकामात केला जात आहे. सरकारने आता इमारत बांधकामात देखील फ्लाय अ‍ॅश वापरण्याची परवानगी दिली आहे. त्याचा लाभ घेत बेंगळुरू येथील ‘अ‍ॅश टॅग’ कंपनीने चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका खासगी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाकडून नाममात्र दरात राख खरेदी केली आहे. मध्य रेल्वेने ही राख दोन टप्प्यात ११६ मालडब्यातून (वाघिनी)  ७ हजार ८०० टन बेंगळुरुला रवाना केली आहे. आता चंद्रपूर औष्णिक केंद्रातील राखही मालगाडीने पाठविण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. ‘फ्लाय अ‍ॅश’ वापरून बांधकामाच्या विटा बनवण्याचा उद्योग नागपूर जिल्ह्य़ासह विदर्भ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथे चालतो. यासोबतच बेंगळुरूतही असे उद्योग आहेत. राज्यातील १६ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून वर्षांला हजारो टन फ्लाय अ‍ॅश तयार होते. राखेमुळे प्रदूषण वाढते. जमिनीवर टाकलेली राख हवेबरोबर उडत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यावर उपाय म्हणून १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात इमारतीच्या बांधकामात ही राख वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.