विद्यापीठाच्या पुनरावलोकनात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त केलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने परीक्षा पद्धतीत सुधार झाल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी परीक्षेच्या काळात होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विरोधात आणि काहींनी समर्थनात ‘सैराट’ मते व्यक्त करून बनावट, थर्ड क्लास, होप-लेस सारखी शेलकी विशेषणे वापरून ८४ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेतला आहे.
परीक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा होत असल्याचे सांगितले जात असले तरी या एकूण व्यवस्थेचा केंद्रस्थानी असलेला विद्यार्थी वेळेवर हॉल तिकीट न मिळणे, परीक्षेचे चुकीचे वेळापत्रक मिळणे, वेळेवर निकाल न लागल्याने नोकरी हातची जाणे, शिवाय वेळेवर पुनर्मूल्यांकन होत नसल्याने विद्यापीठ व्यवस्थेला कंटाळला आहे. म्हणूनच अशा पुनरावलोकनाच्या माध्यमातून त्याने त्याच्या त्रागा व्यक्त केल्याचे निदर्शनास येते.
लिझ परचेज याने विद्यार्थ्यांना वेळेत हॉल तिकीट न मिळणे आणि परीक्षेचे चुकीचे वेळापत्रक मिळाल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकतात, या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधून माजी पंतप्रधान नरसिंहराव आणि डॉ. श्रीकांत जिचकार याच विद्यापीठातून उत्तीर्ण झाले यावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याला हे विद्यापीठ बंद करायला सांगणार आहे. संत तुकडोजी महाराजांच्या नावाला विद्यापीठ कलंक लावत असल्याचा त्रागा त्याने व्यक्त केला असून येथील शिक्षण पद्धत निम्नतरीय असून गेल्या २५ वर्षांपासून अभ्यासक्रमात सुधारणा नाही. मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीची कॉपी करण्याचा नागपूर विद्यापीठ प्रयत्न करते, पण त्या दोन्ही विद्यापीठांचा स्वभाव वेगळा असून ते त्यांची ऑनलाईन परीक्षा, मूल्यांकन आणि निकाल लावण्यास सक्षम आहेत. मात्र नागपूर विद्यापीठ अनियंत्रित आहे.
जिम्मी जार्डन या विद्यार्थ्यांने तर बनावट विद्यापीठाच्या यादीत नागपूर विद्यापीठाला नेऊन ठेवले आहे. कारण वेळेवर निकाल न लावणे, जबरदस्तीने विद्यार्थ्यांना नापास करून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारे विद्यापीठ असा आरोप केला आहे. वैभव हटेवार याने विद्यार्थ्यांना नष्ट करणारे अतिशय वाईट विद्यापीठ अशा तिखट शब्दांत विद्यापीठावर टीकेची झोड उठवली आहे. विद्यार्थ्यांची लूट करून केवळ पैसा मिळवण्यासाठी विद्यापीठ चालवले जाते. चार महिने होतात तरी निकाल लागत नाही आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल त्याच विषयाची परीक्षा जेव्हा विद्यार्थी देतात तेव्हा लागतो, हे कटू सत्य सांगून एकही ‘स्टार’ मिळवण्याच्या लायकीचे हे विद्यापीठ नाही!
विनीता सुरेश हिने तर विद्यापीठाला एक ‘स्टार’ तरी का द्यावा, असा प्रश्न उपस्थित केला असून स्वत:चा अनुभव कथन केला. विद्यापीठात कोणीही फोन उचलत नाही. पीएच.डी. कक्षात संपर्क साधण्याचे काहीच साधन नाही. तिने मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून मुख्यमंत्री या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्याने अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचे तिने पुनरावलोकनात म्हटले आहे.
मनुचंद्रन नायर याने दर्जाहीन विद्यापीठाच्या रांगेत नागपूर विद्यापीठाला बसवले असून येथील अयोग्य व्यवस्थापन, विसंवाद, निम्न दर्जा, योग्य मूल्यांकनाचा अभाव, वेळापत्रक आणि अनियोजित निकाल यासाठी विद्यापीठ ओळखले जाते. जास्त शुल्क आणि कमी ज्ञान असे नागपूर विद्यापीठ असून विद्यापीठाला केवळ पैसा हवा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसल्याची खंत व्यक्त केली आहे. निशांत रपाटेच्या मते, नागपूर विद्यापीठ जुने असून इतर मुक्त विद्यापीठांच्या तुलनेत चांगले आहे. काळानुसार बदल अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. अशा तब्बल ८४ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कामाच्या विरोधात आणि समर्थनात मते व्यक्त केली आहेत.

संतोष शुक्ला आणि रत्नेश कुमार
विद्यापीठात लाखोच्या संख्येने विद्यार्थी प्रवेश करतात. विद्यापीठाला दोष देऊ शकत नाही. कारण विद्यार्थी ज्या महाविद्यालयांमध्ये शिकतात तेथील शिक्षक मूल्यांकनासाठी येतच नसतील किंवा त्यांना पाठवले जात नाही. विद्यापीठ केवळ एक माध्यम आहे. रत्नेश कुमारच्या मते, जरी जास्त मेहनत घ्यावी लागली तरी विद्यापीठातील चार वर्षांचा अनुभव खूपच चांगला होता. मला चांगलीच माणसे भेटत गेली. यासारखी विद्यापीठाविषयी चांगली मते देणाऱ्या विद्यार्थ्यांनीही चांगल्या शब्दांत विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेतला आहे.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना नोट्स उपलब्ध होत नाहीत. शिवाय अभ्यासक्रमही कालबाह्य़ आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाखोंच्या संख्येने संदर्भ ग्रंथ उपलब्ध असताना विद्यापीठाने दिलेला अभ्यासक्रम मात्र त्यात सापडत नाही. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केवळ ‘व्हीबीडी’च आहे. मात्र त्यातून लिहिले की परीक्षेत उत्तीर्ण होत नाही. हे बरेच जुने विद्यापीठ असूनही ठरवण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार ग्रंथ किंवा संदर्भित ग्रंथ उपलब्ध करण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याची टीकाही विद्यार्थ्यांनी केली आहे.

परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी म्हणाले, विद्यापीठाला सर्वानी सहकार्य केले तरच विद्यार्थ्यांंच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागू शकतील. इतर विद्यापीठांमध्ये पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालये घेतात. केवळ तिसऱ्या वर्षांच्या परीक्षा विद्यापीठ घेतात. मात्र, आपल्याकडे सर्वच्या सर्व परीक्षा विद्यापीठालाच घ्याव्या लागतात. एकूण ९०० परीक्षा आम्ही घेतो. अलीकडेच एका बैठकीत निदान विषम सत्राच्या परीक्षा तरी महाविद्यालयांनी घ्याव्यात, असे मत व्यक्त केले होते. मात्र, याविषयी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही.