महेश बोकडे

जिल्ह्यात १ जानेवारी २०२१ ते १५ एप्रिल २०२१ पर्यंत १ लाख ७९ हजार ९२ रुग्ण आढळले तर २ हजार १०४ मृत्यू झाले. विशेष म्हणजे, एकूण साडेतीन महिन्यात आढळलेल्या रुग्णांतील ८५ टक्के रुग्ण गेल्या दीड महिन्यातील असून एकूण मृत्यूंमध्ये ८० टक्के मृत्यू हे दीड महिन्यातील आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवलानुसार, नागपूर शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत जानेवारी २०२१ महिन्यात करोनाचे ८ हजार ६२१, ग्रामीणला १ हजार ७९३, जिल्ह्याबाहेरील ९३ असे एकूण १० हजार ५०७ रुग्ण आढळले. या काळात येथे करोनाचे शहरात ८४, ग्रामीण ५१, जिल्ह्याबाहेरील ९३ असे एकूण २२८ मृत्यू झाले. फेब्रुवारीमध्ये शहरात १२ हजार ८६७, ग्रामीण २ हजार ५८१, जिल्ह्याबाहेरील ६६ असे एकूण १५ हजार ४१४ नवीन रुग्ण आढळले. या कालावधीत शहरात ८०, ग्रामीण ३१, जिल्ह्याबाहेरील ६६ असे एकूण १७७ मृत्यू झाले. मार्चमध्ये शहरात ५८ हजार ६६, ग्रामीण १८ हजार ५१, जिल्ह्याबाहेरी ९३ असे एकूण ७६ हजार २५० रुग्ण आढळले. तर शहरात ४४६, ग्रामीण २२४, जिल्ह्याबाहेरील ९३ असे एकूण ७६३ मृत्यू झाले.

१ ते १५ एप्रिलदरम्यान शहरात ४९ हजार ८१४, ग्रामीण २६ हजार ९१६, जिल्ह्याबाहेरील ८१ असे एकूण ७६ हजार ८११ रुग्ण आढळले. शहरात या कालावधीत ५११, ग्रामीण ३५५, जिल्ह्याबाहेरील ८१ असे एकूण ९३६ मृत्यू झाले. दरम्यान, शहरात दुसऱ्या लाटेत १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत दोन महिन्यात २१ हजार ४८८, ग्रामीण ४ हजार ३७४, जिल्ह्याबाहेरील १५९ असे एकूण २६ हजार २१ रुग्ण आढळले. शहरात या काळात १६४, ग्रामीण ८२, जिल्ह्याबाहेरील १५९ असे एकूण ४०५ मृत्यू झाले. १ मार्च ते १५ मार्च २१ पर्यंत शहरात १ लाख ७ हजार ८८०, ग्रामीण ४४ हजार ९६७, जिल्ह्याबाहेरील १७४ असे एकूण १ लाख ५३ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले.

या कालावधीत शहरात ९५४, ग्रामीण ५७९, जिल्ह्याबाहेरील १७४ असे एकूण १ हजार ६९९ मृत्यू झाले. त्यामुळे शहरात दुसऱ्या लाटेतील पहिल्या दोन महिन्याच्या (जाने. व फेब्रु. २१) तुलनेत दीड महिन्यात (१ मार्च ते १५ एप्रिल २१) शहरात ८३.३९ टक्के नवीन रुग्ण, ८५ टक्के मृत्यू तर ग्रामीणला ९१.१३ टक्के नवीन रुग्ण व ८७.५७ टक्के मृत्यू झाले. तर जिल्ह्यात ८५.४७ टक्के नवीन रुग्ण तर ८०.७५ टक्के मृत्यू झाले.

मृत्यूसंख्या वाढण्याचा धोका

नागपूरच्या शहरी भागात १८ एप्रिलला ४१ हजार ७७९, ग्रामीण २७ हजार ४६४ असे एकूण ६९ हजार २४३ उपचाराधीन  रुग्ण होते. त्यातील  ८ हजार १४६ गंभीर रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये तर ६१ हजार ९७ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. गृह विलगीकरणातील १० ते १५ टक्के रुग्ण हे जोखमीतील असून यापैकी अनेकांना तातडीने प्राणवायू किंवा जीवनरक्षण प्रणालीच्या खाटेची गरज आहे. परंतु शहरातील सर्व रुग्णालयांत खाटा भरल्याने  मृत्यूसंख्या वाढण्याचा धोका आहे.