नाईक तलाव-बांगलादेश येथील ७२ जणांचा समावेश; शहरातील एकूण बाधितांची संख्या साडेआठशे पार

नागपूर : उपराजधानीत एकाच दिवशी नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील ७२ जणांसह शहराच्या विविध ठिकाणी तब्बल ८६ नवीन करोनाबाधित आढळल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. हा शहरात एकाच दिवशी आढळलेल्या एकूण बाधितांच्या संख्येचा

उच्चांक आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या साडेआठशेच्या पुढे गेली आहे. यापैकी पाचशेहून अधिक

जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

नवीन सर्व बाधित विलगीकरण केंद्रातील असल्याने संसर्ग पसरण्याचा धोका नसल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे. बाधितांमध्ये नाईक तलाव-बांगलादेश येथील ७२ जण आढळल्याने आता येथेही करोनाचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सतरंजीपुरातील ७, इसासनी (हिंगणा) ७ येथीलही १४ जणांना  बाधा असल्याचे स्पष्ट झाले. तातडीने सगळ्यांना मेडिकल, मेयो आणि एम्स या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यापूर्वी या व्यक्तींच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या सगळ्यांनाही  विलगीकरण केंद्रात ठेवले जाणार आहे. नाईक  तलाव आणि बांगलादेश परिसरात आणखी रुग्ण सापडण्याचीही शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दोन तास

नाईक तलाव व बांगलादेश परिसरात मोठय़ा प्रमाणात करोना रुग्ण वाढत असल्याने येथे  सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ सकाळी आठ ते दहा असे दोनच तास सुरू राहणार आहेत.

विलगीकरण केंद्रात लोकांचे हाल सुरूच

राज्य पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये  योगेश्वर नगरमधील लोकांना  विलगीकरणासाठी आणले. परंतु या ठिकाणी पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती. खोल्या ही अस्वच्छ असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. शिवाय व्हीएनआयटी व सिम्बॉयसिस येथील केंद्रात पुन्हा  लोकांनी जेवणाबाबत  तक्रारी केल्या. योगेश्वर नगरात करोना  रुग्ण आढळून आल्यामुळे बुधवारी सकाळी या परिसरातील ४० लोकांना सुरेंद्रनगर येथील  राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आणले. यातील एका ज्येष्ठ नागरिकांना सांगितले, दुपारी एक तास पाणीही मिळाले नाही.  खोल्यांमधील शौचालयात पाणी नव्हते. व्हीएनआयटी, सिम्बॉयसिस येथेही  गेल्या चार-पाच दिवसांपासून सुमार दर्जाचे जेवण व वागणूक मिळत असल्याचे वाठोडा व नाईक तलाव येथील लोकांनी सांगितले. चांगले जेवण देणे शक्य नसेल तर आम्हाला  बाहेरून डबा बोलावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

नाईक तलाव-बांगलादेशातील रुग्णसंख्या दोनशे

नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील बाधितांची आजपर्यंतची संख्या दोनशेच्या जवळपास पोहचली आहे. पैकी १० जण करोनामुक्त झाल्याने घरी परतले तर इतरांवर मेडिकल, मेयोसह एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

२४ जण करोनामुक्त

मेडिकलमधून १०, मेयोतून १२ आणि एम्समधून २ अशा एकूण २४ जणांना बुधवारी  करोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. शहरातील आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्याही ५३५ वर पोहचली आहे. शहरात आजपर्यंत एकूण ८६३ जणांना करोनाची बाधा झाली असून १४ जण या आजाराने दगावले आहेत.

‘सारी’च्या रुग्णाचा अहवाल सकारात्मक

मेयो रुग्णालयात भानखेडा परिसरातील एका सारीच्या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. तिची चाचणी केली असता तिलाही करोनाची बाधा असल्याचे पुढे आले. त्यामुळे शहरातील सारीच्या करोनाबाधित  रुग्णांच्याही संख्येत भर पडत असल्याचे  चित्र आहे.

शिवाजीनगर, विश्वकर्मानगर प्रतिबंधित

करोनाबाधित रुग्ण सापडलेल्या शिवाजीनगरसह विश्वकर्मानगर परिसर प्रतिबंधित करण्यात आले. धंतोली झोनमधील वेणुवन हाऊसिंग सोसायटी व हनुमाननगर झोनमधील ताजनगर परिसरातील प्रतिबंधित भागाची व्याप्ती कमी करण्यात आली. शिवाजीनगरात बुधवारी सकाळी पॅरामाऊंट हाईट्ससमोरील भाग बंद करण्यात आला. रुग्णाच्या घरातील सदस्यांना विलगीकरणासाठी नेण्यात आले आहे. धंतोलीतील वेणुवन सोसायटी येथील प्रतिबंधित परिसरातील व्याप्ती कमी करण्यात आली.

याआधीचा उच्चांक

दिवस                        रुग्ण

६ मे २०२०                 ६८

२९ मे २०२०              ४४

५ जून २०२०             ५६

८ जून २०२०              ३१

९ जून २०२०              ४२

१० जून २०२०           ८५