22 November 2017

News Flash

संमेलनाचा वादारंभ आश्रमाच्या जागेवरून

आश्रमाच्या बाबतीत सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजूचे मत प्रवाह आहेत.

प्रतिनिधी, अकोला / नागपूर | Updated: September 12, 2017 3:09 AM

साहित्यिकांच्या विवेकनिष्ठ भूमिकेवर प्रश्नचिन्ह

साहित्य महामंडळाकडून ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनासाठी बुलढाणा जिल्ह्य़ातील हिवरा आश्रमची निवड करण्यात आली. त्याला चोवीस तास उलटले नाही, तोच संमेलनाच्या आश्रमस्थळाच्या निवडीवरून वादाचा आरंभ झाला आहे. वादग्रस्त शुकदास महाराज यांच्या आश्रमामध्ये संमेलन होत असल्यामुळे साहित्यिकांच्या हिवरा आश्रम निवड करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हरयाणामधील बाबा रामरहीमच्या वादग्रस्त प्रतापाचे उदाहरण समोर येत असताना या स्थळाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह पुरोगामी संघटनांनी विरोध केल्याने मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

१४ जानेवारी १९६५ ला शुकदास महाराज यांनी बुलढाणा जिल्ह्य़ाच्या मेहकर तालुक्यातील हिवरा बु. येथे विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. सेवा, त्याग व समर्पणाला वाहून आश्रमाचे कार्य सुरू झाले. रुग्ण चिकित्सेचा हातखंड, लाखोंच्या भोजनावळी, अफाट शैक्षणिक कार्य, विविध सामाजिक उपक्रम आणि अनेक राजकारणी नेत्यांचा राबता यामुळे शुकदास महाराज यांच्याभोवती वलय निर्माण झाले. जनमानसात प्रसिद्ध असलेल्या बाबा-महाराजांकडे होणाऱ्या गर्दीप्रमाणे शुकदास महाराजांच्या दरबारातही भोळी-भाबडी जनता दिसत होती. मात्र, आश्रमाला बुवाबाजी कधी दिसून आली नाही.

१९८८ साली प्रसिद्ध झालेल्या श्याम मानव यांच्या ‘बुवाबाजी बळी स्त्रियांचा’ या पुस्तकात ‘कृष्णाचे सोंग घेणारा राधेचा शुकदास’ या शीर्षकाखाली लेख  प्रसिद्ध झाला. शुकदास महाराजांकडे येणाऱ्या रुग्ण महिला व मुलींची ते दरवाजा बंद करून तपासणी करीत होते, यावर अनेकांनी आक्षेप घेऊन शोषणाचे आरोप केले. त्यावेळी हे प्रकरण प्रचंड गाजले. त्या प्रकरणाला मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धीही मिळाली. मात्र, कोणतीही महिला तक्रार देण्यासाठी पुढे न आल्याने प्रकरण थंड  पडले. अल्पशिक्षण झालेले शुकदास महाराज तज्ज्ञ डॉक्टरप्रमाणे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करीत होते. कोणतीची पदवी नसताना शुकदास महाराज यांचे हे कार्य लीलया चालायचे. अल्पदरात व चांगला उपचार होतो म्हणून रुग्णांची गर्दी हिवरा आश्रमात असायची. मात्र, त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी इतर ठिकाणची रुग्ण तपासणी बंद केली. आश्रमात ते नियमित रुग्ण तपासायचे, औषध लिहून देण्यासाठी मात्र त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरची नियुक्ती केली होती. त्यांची रुग्णसेवा वादग्रस्त ठरली तरीही लाखो रुग्णांवर त्यांनी उपचार केल्याने त्यांच्यावर असंख्य लोकांचा विश्वास होता. आता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आश्रमाची वादग्रस्त पाश्र्वभूमी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

आश्रमाच्या बाबतीत सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजूचे मत प्रवाह आहेत. साहित्य महामंडळाने अखिल भारतील संमेलनासाठी हिवरा आश्रमाची निवड केल्याने अनेकांनी नाराजीचा सूर काढून हा असाहित्यिक पणाचा कळस असल्याचा आरोप केला आहे.

वाद काय?

  • संमेलनस्थळाची घोषणा नागपूरमध्ये होताच या स्थळाला विरोध होण्यास सुरुवात झाली. हिवरा आश्रम, शुकदास महाराज आणि वाद हे समीकरण साधारणत: तीन तपापूर्वी जुळून आले होते.
  • रुग्णसेवा, संस्था, स्वामी विवेकानंदांच्या छायाचित्रासोबत आपले छायाचित्र प्रसिद्धी करणे, रासलीला यासह अनेक वाद शुकदास महाराजांच्या भोवती निर्माण झाले होते. त्यामुळे ते अडचणीतही आले आहेत.
  • १९८४ साली शुकदास महाराजांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने वाद उद्भवला. शुकदास महाराज, ‘गेल्या जन्मी मी भगवान कृष्ण, तू राधा’, असे सांगून मुलींचे शोषण करीत असल्याचा घणाघात अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व संघटक श्याम मानव यांनी केला होता.

..तर रसिकांचे प्रबोधन

वादग्रस्त महाराज व आश्रम साहित्य संमेलनाला प्रतिष्ठा देणार असेल, तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सर्व समविचारी पुरोगामी संघटना कडाडून विरोध करेल, असा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात ‘शुकदासांच्या रासलीला’ जाहीर सभांद्वारे पुन्हा जनतेसमोर मांडू आणि रसिकांचे प्रबोधन करू, असे अंनिसने जाहीर केले आहे.

अंनिसचा विरोध

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाणा जिल्ह्य़ातील हिवरा आश्रममध्ये घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध आहे. या ठिकाणी शुकदास महाराजांचे वास्तव्य होते. समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी बाबांचा भंडाफोड केला होता. तेथील स्थानिक कार्यकर्ते भरत काळे यांनी हे प्रकरण समोर आणले होते. येथे संमेलन झाले तर देशभरात चुकीचा संदेश जाईल. संमेलन घेऊन त्या जागेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कारस्थान नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. त्या ठिकाणी साधनसामुग्री आणि सोयी उपलब्ध असल्याचे महामंडळ म्हणत असेल तर उद्या वादग्रस्त बाबा रामरहीमच्या डेराने प्रस्ताव दिला तर त्या ठिकाणी संमेलन घेणार का? महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असून राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू आहे. बुवाबाजीच्या विरोधात अभियान सुरू आहे. याची कल्पनाही महामंडळाच्या अध्यक्षांना आहे. तरीही हिवरा आश्रमचा आग्रह का? येथे संमेलन होत असेल तर त्याला समिती विरोध करणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे.

उमेश चौबे, कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर

विरोध संमेलनाला नाही, आश्रमाला

विरोध संमेलनाला नाही तर आश्रमाला विरोध आहे. मात्र, आश्रमात संमेलन होत नाही तर त्या परिसरातील जागेवर ते होणार आहे. तेथील विज्ञाननिष्ठ विचार महामंडळाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हिवरा आश्रम ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. विदर्भ साहित्य संघ हिवरा शाखा आणि बुलढाणा जिल्ह्य़ातील अकरा शाखांमिळून हे संमेलन होत आहे. दिल्लीने प्रस्ताव नाकारल्यानंतर बडोदा आणि हिवरा आश्रम ही आलेल्या निमंत्रणापैकी दोन स्थळं होती. त्यापैकी ज्या ठिकाणी संमेलनाच्या दृष्टीने साधनसामुग्री उपलब्ध आहे अशा ठिकाणी संमेलन घेण्याचे निश्चित झाले. शिवाय ग्रामपातळीवर इतक्या मोठय़ा प्रमाणात व्यवस्था असलेले हे गाव आहे. येथे संमेलन घेण्यामागे ग्रामीण भागात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती पोहचावी हा उद्देश आहे. शुकदास महाराजाचा किंवा तेथील आश्रमाचा, त्यांच्या कार्याचा प्रचार करण्याचा संमेलनाचा उद्देश नाही. आश्रमबाबत काही वाद असेल तर त्याबाबतचे खंडन तेथील लोक करतील. महामंडळाला त्याची गरज नाही किंवा विदर्भ साहित्य संघ त्याबाबत बोलणार नाही.

श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ.

अंनिसकडून न्यायालयाचा अवमान, विवेकानंद आश्रमाकडून प्रत्युत्तर

शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम २००१ मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी बजाविला. त्या आदेशाचे उल्लंघन व न्यायालयाचा अवमान मानव व अंनिसचे सहकारी करीत आहेत. प्रसिद्धीच्या लालसेपोटी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. शुकदास महाराज यांनी कधीही कुणाचे शोषण केले नाही, फसवणूक केली नाही किंवा धर्माच्या नावाने अंधश्रध्देला खतपाणी घातले नाही. वेदान्त आणि विज्ञान यांची सांगड घालून त्यांनी आरोग्य, कृषीविकास, शिक्षण, अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रात कार्य केले.

संतोष गोरे, आश्रमाचे मुख्य प्रवक्ते व सचिव

First Published on September 12, 2017 3:09 am

Web Title: 91th akhil bharatiya marathi sahitya sammelan ashram place issue