News Flash

शुकदास महाराजांची पाश्र्वभूमी वादग्रस्त!

भक्तांनी महाराजांच्या हाताला यश आहे असा प्रचार सुरू केला आणि पंचक्रोशीतील रुग्णांची गर्दी या आश्रमात व्हायला सुरुवात झाली.

शुकदास महाराजांची पाश्र्वभूमी वादग्रस्त!

कोणतेही वैद्यकीय शिक्षण नाही तरीही लाखो रुग्णांवर उपचार करून बरे केल्याचा दावा करणे आणि मी ‘कृष्ण’ तू ‘राधा’ असे सांगत महिला रुग्णांचे शोषण करण्याचा आरोप असणे ही साहित्य संमेलनाची यजमानपद मिळवलेल्या बुलढाण्यातील विवेकानंद आश्रमाची वैशिष्टय़े आहेत. बुवाबाजीचे पीक सध्या जोरावर आले असताना साहित्य महामंडळाने समस्त सारस्वतांना या अंधश्रद्धेची पाठराखण करणाऱ्या आश्रमाच्या दावणीला बांधण्याचा प्रकार हा निर्णय घेऊन केला आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९१वे साहित्य संमेलन बुलढाणा जिल्ह्य़ातील हिवरा या गावातील आश्रमात होणार आहे. केवळ चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या शुकदास महाराजांनी १९६५ मध्ये हा आश्रम स्थापला. त्याला चतुराईने विवेकानंदांचे नाव देण्यात आले. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय असा मोठा पसारा असलेला हा आश्रम तीन दशकांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आपण विवेकानंदांचे भक्त आहोत असा दावा करणाऱ्या शुकदास महाराजांनी वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसताना या भागातील रुग्णांवर उपचार करणे सुरू केले. यासाठी त्यांनी आश्रमातच रुग्णालय उभारले. त्यांच्या भक्तांनी महाराजांच्या हाताला यश आहे असा प्रचार सुरू केला आणि पंचक्रोशीतील रुग्णांची गर्दी या आश्रमात व्हायला सुरुवात झाली. तब्येतीची तक्रार घेऊन आलेल्या कोणत्याही रुग्णाला शुकदास महाराज औषधाची एक पुडी द्यायचे. त्यात काय असायचे हे कुणालाच कळायचे नाही. मात्र हे औषध घेतले की रुग्ण बरा होतो असा दावा या आश्रमाकडून केला जायचा व त्याला दुजोरा देण्यासाठी काही रुग्णांनाही समोर केले जायचे. रुग्णांची तपासणी करण्याची महाराजांची पद्धतही वेगळी होती. पुरुषांना ते सर्वासमोर तपासायचे. महिलांना मात्र बंद खोलीत तपासायचे. महिलांना तपासताना हे महाराज ‘गेल्या जन्मी मी भगवान कृष्ण तर तू राधा’ असे सांगायचे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी तेव्हा केला होता. मानव यांनी एका वृत्तपत्रात लेखमाला लिहून या महाराजांच्या ढोंगीपणावर प्रहार केला होता. तेव्हा हे प्रकरण खूप गाजले होते. आश्रम व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार मानव यांनी आरोप केले, पण त्याच्या समर्थनार्थ ते एकही पुरावा सादर करू शकले नाहीत. महाराज महिलांचे शोषण करतात, असा आरोप मानव यांनी केला. मात्र तसा कबुलीजबाब एकाही महिलेने दिला नाही. अखेर हे प्रकरण अकोल्याच्या न्यायालयात गेले. न्यायालयाने मानव यांनी या आश्रमाची बदनामी करू नये, असा आदेश दिला.

त्यानंतर या आश्रमाची वाटचाल पुन्हा सुरू झाली. आता आरोप होऊ नये म्हणून महाराजांनी आश्रमातील रुग्णालयात काही तज्ज्ञ डॉक्टर नोकरीवर ठेवले. रुग्णांना महाराज तपासायचे आणि औषधे मात्र तज्ज्ञ डॉक्टर लिहून द्यायचे. यामुळे कायद्याच्या कचाटय़ातून महाराजांची सुटका झाली आणि त्यांच्या रुग्णसेवेतील जडीबुटीची जागा ‘अ‍ॅलोपॅथी’च्या औषधांनी घेतली. मानव यांच्या आरोपानंतर या महाराजांनी बुलढाणा जिल्ह्य़ात ठिकठिकाणी सुरू केलेली उपचार केंद्रे बंद केली व केवळ आश्रमातच रुग्णसेवा सुरू ठेवली. सहा महिन्यांपूर्वी निधन झालेल्या शुकदास महाराजांनी आपल्या आश्रमात केवळ विवेकानंदांचे विचार शिकवले जातात, असा दावा सातत्याने केला. मात्र या आश्रमात होणारे दैनंदिन कार्यक्रम वेगळेच आहेत. गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा या सणांच्या दिवशी या आश्रमात सहस्रभोजनाचा कार्यक्रम होतो.  याशिवाय विवेकानंदांच्या जन्मदिवशी एक लाख लोकांना जेवू घातले जाते. या जेवणावळीची चर्चा नंतर वर्षभर सुरू राहते. या आश्रमाला देशविदेशातून देणग्या मिळतात. येथे लाखो लोक जमत असल्याने स्थानिक नेतेही कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असतात.

या वादग्रस्त आश्रमाला संमेलनाचे यजमानपद देताना साहित्य महामंडळाने केवळ आर्थिक क्षमता व संमेलनासाठी आवश्यक असलेल्या सुखसोयी या दोनच गोष्टींचा विचार केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या आश्रमाची आर्थिक स्थिती उत्तम आहे व ते संमेलनाच्या खर्चाचा भार सहज उचलू शकतील तसेच या आश्रमात एकाच वेळी लाखो लोक राहू शकतील अशी व्यवस्थासुद्धा आहे. त्यामुळे संमेलनाचे आयोजन करणे सोयीचे जाईल, हा विचार करून हे यजमानपद देण्यात आले असले तरी या निर्णयातून अप्रत्यक्षपणे बुवाबाजीलाच प्रोत्साहन देणार आहे, याचा विचार महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पडला. उल् लेखनीय म्हणजे बुलढाणा जिल्ह्य़ातील विदर्भ साहित्य संघाच्या सर्व शाखांनी याच आश्रमाला यजमानपद द्या, असा आग्रह महामंडळाकडे धरला होता.

शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमांवर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहेत. शुकदास महाराजांनी कधीही कुणाचे शोषण केले नाही. फसवणूक केली नाही किंवा धर्माच्या नावाने अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. वेदांत आणि विज्ञान यांची सांगड घालून त्यांनी आरोग्य, कृषीविकास, शिक्षण, अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रात कार्य केले आहे. विवेकानंद आश्रमात हेच कार्य निरंतर सुरू असून दरिद्री, पीडित, रोगी यांची सेवा केली जाते. शुकदास महाराजांनी अगोदर आयुर्वेदात रुग्णांवर उपचार केले. त्यानंतर त्यांनी ‘अ‍ॅलोपॅथी’चा सखोल अभ्यास करून त्या पॅथीच्या उपचाराद्वारे रुग्णांना दिलासा दिला. आरोप करणाऱ्यांनी विवेकानंद आश्रमात येऊन पाहणी करावी.

संतोष गोरे, मुख्य प्रवक्ते व सचिव, विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2017 3:24 am

Web Title: 91th akhil bharatiya marathi sahitya sammelan shukdas maharaj ashram place issue
Next Stories
1 छोटय़ा रस्त्यांवर स्कूलबसला प्रतिबंध?
2 दयाशंकर तिवारींविरुद्ध गुन्हा दाखल
3 देशी दारू दुकानांना दिलासा
Just Now!
X