आयोजकांवर गंभीर आरोप करणारे महामंडळ नरमले

शफी पठाण, लोकसत्ता
नागपूर : ‘नाशिक साहित्य संमेलनाच्या खर्चाचे अंदाजपत्रक संशयास्पद वाटत आहे’ असा गंभीर आरोप करीत आयोजकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या साहित्य महामंडळाने आता मात्र नाशिकबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. शतक महोत्सवानिमित्त नागपूरचा प्रस्ताव देणाऱ्या विदर्भ साहित्य संघाने अनपेक्षित असमर्थता दर्शविल्याने महामंडळाची कोंडी झाली आणि नाईलाजाने त्यांना नाशिकशीच ‘तडजोड’ करावी लागल्याची माहिती आहे. महामंडळाचे नाशिकबाबतचे मत एका रात्रीत का बदलले, याचे उत्तर नागपूरच्या नकारात दडले असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

साहित्य महामंडळचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याआधी अनेकदा नाशिक येथे प्रस्तावित ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत कधी संकेतातून तर कधी स्पष्टच असमर्थता दर्शवली. यासाठी त्यांनी कधी करोनाचे कारण पुढे केले तर कधी आयोजकांच्या आर्थिक अनियमिततेवर बोट ठेवले. इतकेच करून ते थांबले नाहीत तर ८ ऑगस्ट रोजी आयोजित महामंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेत पुढच्या साहित्य संमेलनाच्या स्थळनिवडीसाठी समिती गठित करण्याचे सूतोवाच केले. परंतु, नाशिकला दुर्लक्षून ज्या नागपूरकडे ते आशेने बघत होते त्या नागपुरातील विदर्भ साहित्य संघाने आधी दिलेल्या प्रस्तावाबाबत ऐनवेळी असमर्थता दर्शवली. त्यामुळे  नाईलाजाने नाशिकच्या गळ्यातून काढू पाहणारी यजमानपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात घालण्याची वेळ महामंडळावर आली. दुसरीकडे महामंडळाचे सर्व आरोप झेलूनही आयोजनाबाबत नाशिककर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने व महामंडळाच्या निर्वाणीच्या पत्राला तितक्याच आक्रमकपणे पण, सकारात्मक उत्तर दिल्याने नाशिकशीच जुळवून घेण्याशिवाय  महामंडळाकडे दुसरा पर्यायच उरला नाही. यातूनच आयोजक व महामंडळाच्या परवा औरंगाबादेत घडलेल्या भेटीला ‘मनोमिलना’चे रूप देऊन वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.

‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर…

‘नाशिकला दुर्लक्षून नव्या साहित्य संमेलनाचा शंखनाद’ अशा शीर्षकाची बातमी ‘लोकसत्ता’ने २८ जुलैच्या अंकात प्रकाशित केली होती. या बातमीची महामंडळाच्या घटक संस्थांनी गंभीर दखल घेत महामंडळाकडे या विचित्र निर्णयाबाबत विचारणा सुरू केली. ‘आधी नाशिकचा विषय मार्गी लावा व त्यानंतर नव्या संमेलनाचा विचार करा’, अशा स्पष्ट शब्दात पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने महामंडळाला खडसावले. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या तपस्वी संशोधकाची संमेलाध्यक्षपदी निवड झाल्याने हे संमेलन रद्द होऊ नये, यासाठी महाराष्ट्र व बुहृनमहाराष्ट्रातील प्रतिनिधीही आक्रमक झाले. ८ ऑगस्टला प्रस्तावित बैठकीत या विषयावरून रोषाला सामोरे जावे लागेल. अशावेळी एखाद्या विषयावर मतदान घेण्याची वेळ आली तर आपण एकटे पडू, याची जाणीव झाल्यानेही महामंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या ‘मूळ’ स्वभावाला मुरड घातल्याची माहिती आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत विचार सुरू होता. परंतु, करोना काळातील आव्हाने आणि शासकीय निधीबाबत अनिश्चितता असल्याने तूर्तास कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

– मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, नागपूर.

संमेलनाच्या आयोजनाबाबत विदर्भ साहित्य संघाकडून कुठला प्रस्ताव आल्याची मला तरी माहिती नाही. महामंडळाचे अध्यक्षच याबाबत काय ते सांगू शकतील.

– दादा गोरे, कार्यवाह, साहित्य महामंडळ, औरंगाबाद.