वर्षभरात फक्त ६ लाख नागरिकांचीच पडताळणी

नागपूर : उपराजधानीची लोकसंख्या सुमारे पस्तीस लाखांवर आहे, परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या एका वर्षांत फक्त ६ लाख नागरिकांची क्षयरोग पडताळणी केली. त्यात ९४ नवीन रुग्ण शोधण्यात आले. हा आजार झपाटय़ाने पसरत असतानाही क्षयरोग पडताळणीचा वेग मंद असल्याने या आजारावर नियंत्रण मिळणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केंद्र व राज्य शासनाने शेवटच्या क्षयरुग्णांपर्यंत पोहचून २०२५ पर्यंत देशातून हा आजार नाहीसा करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी देशातील सर्वच शासकीय रुग्णालयांसह खासगी डॉक्टरांकडेही उपचाराला येणाऱ्या क्षयरुग्णांना नि:शुल्क उपचाराची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी सार्वजनिक आरोग्य विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरोग्य विभागाला तेथील सर्व नागरिकांची पडताळणी करत संशयित क्षयरुग्ण शोधावे लागतात. यात कुणी क्षयरुग्ण आढळल्यास त्यावर औषधोपचार करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागानेही शहरात राहणाऱ्या सुमारे ३५ लाख नागरिकांची पडताळणी करणे अपेक्षित आहे, परंतु २०१८ या वर्षी शहरातील झोपडपट्टी भागातील केवळ ६ लाख नागरिकांचीच पडताळणी केली गेली. त्यात ९४ रुग्णांना क्षयरोग असल्याचे पुढे आले. हा आजार गरिबांसोबतच श्रीमंत भागातील नागरिकांमध्येही आढळतो. आजही हा आजार लपवण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे उच्च व मध्यमवर्गीय गटातील नागरिकांमध्येही या आजाराची पडताळणी व्हायला हवी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी कमी

शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रत्येक नागरिकांची क्षयरोग पडताळणी करण्यासाठी कर्मचारी कमी आहेत. शहरात सध्या केवळ ४६९ आशा कर्मचारी असून आरोग्य विभागातील इतर कर्मचारीही सहभागी करून घेतल्यास सहा लाखाहून जास्त नागरिकांची एका वर्षांला पडताळणी शक्य नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. प्रत्येक वर्षी फक्त सहा लाख नागरिकांची पडताळणी केल्यास नवीन रुग्ण लवकर सापडणार नाहीत. परिणामी, ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापासून तो इतरांपर्यंत पसरत जाईल, असे वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार सांगतात.

‘‘महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून क्षयरुग्णांवर उपचार केला जातो. गेल्यावर्षी झोपडपट्टी भागातील ६ लाख नागरिकांची पडताळणी करत ९४ नवीन क्षयरुग्ण शोधत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. याहीवर्षी पडताळणीची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनाला महिला आरोग्य समितीच्या ५०० सेविका वाढवून देण्याची विनंती केली आहे.’’

– डॉ. के.व्ही. तुमाने, उपसंचालक, नागपूर महापालिका