नाटककार प्रेमानंद गज्वी यांची स्पष्टोक्ती

शफी पठाण, नागपूर</strong>

मी कोणताच ‘वाद’ मानत नाही. त्यामुळे कुठल्याही ‘इझम’चे लेबल असलेली नाटय़ संमेलन अध्यक्षाची पगडी मी घालणार नाही, असे स्पष्ट मत ९९व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, आयोजकांच्या ‘वैचारिक’ आदर्शाचे प्रतिबिंब संमेलनावर उमटणे स्वाभाविक आहे. परंतु मी कोणताही इझम मानत नाही. नाटय़ संमेलन असो वा साहित्य संमेलन. आज ही संमेलने आयोजकाश्रित झालेली आहेत. मात्र माझी पहिली आणि शेवटची बांधिलकी कलेशी आहे आणि तिच्याखातरच मी हे अध्यक्षपद स्वीकारले आहे, असेही ते म्हणाले.

बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी ‘लोकसत्ता’ला विशेष मुलाखत दिली. रंगभूमीच्या सद्यस्थितीविषयी गज्वी म्हणाले, आज भूमिका घेऊन लिहिणारे नाटककार अगदीच बोटावर मोजण्याइतके उरले आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर नकार, विद्रोह आणि अंत्योदयाचा विचार असलेल्या नाटकांना लोकाश्रय लाभत नाही. दुसरे, आज अशी नाटके लिहिणाऱ्यांना भयाने पछाडले आहे. बाबरी ते दादरी असे सभोवतालचे भयान वास्तव कुणी नाटकात मांडायला लागले तर लगेच तो समाजात एकटा पडतो, त्याचे शत्रू वाढतात. पण, म्हणून सगळ्यांनीच आपल्या लेखण्या म्यान केलेल्या नाहीत. अस्वस्थ वर्तमानाची ही धग व्रतस्थपणे टिपणारा शेवटचा कलावंत जिवंत असेपर्यंत समाजाला घाबरण्याचे कारण नाही. आज विकासाचे जे चित्र दाखवले जातेय ते बघून तुम्ही लिहिलेल्या ‘घोटभर पाणी’ या नाटकाची प्रासंगिकता संपलीय, असे वाटत नाही का? या प्रश्नावर गज्वींचे उत्तर अतिशय मार्मिक होते. ते म्हणाले, आज पाणी ही मूळ समस्या राहिली नसेल. पण, पाण्याआडून विषमतेचा जो विषाक्त विचार रुजवला होता तो कायमच आहे. आजही श्रीमंतांच्या वस्तीत नळ बरोबर संध्याकाळी पाचला येतो. वंचितांच्या वस्तीत यायला त्याला रात्री एक वाजता येतो.

विषमता अशी रूप बदलत असते. हे सर्वच क्षेत्रांत आहे. अगदी कलेचे क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही, याकडेही गज्वींनी लक्ष वेधले.

संमेलनाध्यक्षाला कक्ष का नाही?

नाटय़ संमेलनाचे तीन दिवस संमेलनाध्यक्षाला महत्त्व असते. परंतु संमेलन संपले की वर्षभराच्या कारकीर्दीत तो काय करणार कुणी विचारत नाही. संमेलनाध्यक्षाच्या कल्पनेतील रंगभूमीविषयक एखाद्या योजनेवर चर्चा करायची असेल तर ती चहाच्या टपरीवर करावी लागते. कारण, नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात संमेलनाध्यक्षासाठी वेगळे कक्ष नाही. तिथे एखादा छोटेखानी कार्यक्रम घ्यायचा असेल तर केंद्रीय शाखेची परवानगी घ्यावी लागते. संमेलनाध्यक्षाची इतकीच किंमत आपण करणार आहोत का? मी हे माझ्यापुरता बोलत नाही. परिषदेने सांगितले तर वर्षभराचा कार्यक्रम मी द्यायला तयार आहे. परंतु काही सकारात्मक बदल आता नाटय़ संमेलनाच्या स्वरूपात आणि नाटय़ परिषदेच्या कारभारात व्हायला हवेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

विदर्भाला रंगभूमीच नाही

मी मूळचा विदर्भातील आहे. विदर्भात उत्तम कलावंत असूनही येथील रंगभूमी तितकी सक्षम झाली नाही, हे वास्तव आहे. झाडीपट्टीची नाटके चार महिन्यांत कोटय़वधींची उलाढाल करतात. परंतु आजही या नाटकाचा मंच शेताच्या बांधावर उभा राहतो. पुरुष वेगळे बसतात, स्त्रिया वेगळ्या बसतात. मकरंद अनासपुरे, मोहन जोशी येथील नाटकात काम करून वाहवा मिळवतात. परंतु वैदर्भीय रंगभूमीला स्वत:चा डॉ. श्रीराम लागू कधी का घडवता आला नाही, हा खरा प्रश्न आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्वत:तील न्यूनगंड आणि वैचारिक मागासलेपणावर मात करावी लागेल. कारण शेवटी कलावंत मुंबईचा असो वा गडचिरोलीचा. समाजातील कुरूपता नष्ट करण्याचे काम कलावंतांना करायचे आहे हे विसरून चालणार नाही, ही बाबही गज्वींनी आवर्जून सांगितली.