शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटीत किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया हृदयरुग्णांकरिता असलेल्या सीव्हीटीएसच्या शस्त्रक्रिया गृहात होत आहे. किडनीच्या रुग्णांकरिता शासनाने स्वतंत्र शस्त्रक्रिया गृहासह मनुष्यबळ दिले नसल्याने तब्बल चार हृदयाच्या शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागतात. त्यामुळे हा प्रकार म्हणजे हृदय रुग्णांवर बेतण्याचा धोका असून शासन किडनीग्रस्तांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृहासह मनुष्यबळ केव्हा देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विदर्भात केवळ नागपूरच्या सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयातच हृदय रुग्णांवर अद्ययावत उपचाराकरिता महागडय़ा उपकरणांसह मनुष्यबळ शासनाकडून उपलब्ध करून दिल्या गेले आहे. त्यामुळे हृदयाच्या बायपाससह विविध प्रकारच्या क्लिष्ट सर्जरी येथे उपलब्ध आहे. विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या शासकीय रुग्णालयांतही हृदयाच्या शस्त्रक्रियेची सोय नसल्याने तेथूनही गंभीर हृदयरुग्ण उपचाराकरिता नागपूरच्या सुपरस्पेशालिटीत येतात. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या बघता येथे हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी रोज मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची प्रतीक्षासूची फुगलेली दिसते. या शस्त्रक्रिया करण्याकरिता सुपरला शासनाने कोटय़वधींची सीव्हीटीएस शस्त्रक्रिया गृह उपलब्ध करून दिले आहे.
त्यामध्ये रोज किमान दोन हृदयरुग्णांवर बायपास सर्जरी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येते. नुकतेच सुपरस्पेशालिटीत प्रशासनाने प्रामाणिक प्रयत्न करीत पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. ही मध्य भारतातील शासकीय रुग्णालयातील पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे, तर राज्यातील राजीव गांधी जीवनदायी योजने अंतर्गत ही पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे. हा प्रकार सुपरस्पेशालिटीसह नागपूरकरिता भूषावह आहे, परंतु या शस्त्रक्रियेमुळे तीन दिवस हृदयरुग्णांच्या शस्त्रक्रिया बंद ठेवाव्या लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रत्येक शस्त्रक्रियेमुळे तीन दिवसांत तब्बल ४ हृदयाच्या शस्त्रक्रिया टाळाव्या लागत असल्याने हा प्रकार हृदय रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा धोका आहे.
सुपरस्पेशालिटी रुग्णालयात स्वतंत्र किडनी प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रिया गृह तयार करण्यासह आवश्यक मनुष्यबळ मिळावा, यासाठी शासनाला एक प्रस्ताव दिला गेला होता. त्यामध्ये निवासी डॉक्टरांसह वरिष्ठ निवासी डॉक्टर व इतर तांत्रिक पदेही मागण्यात आली होती, परंतु हा प्रस्ताव अद्याप शासनाकडे धूळखात असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुपरला होणाऱ्या प्रत्येक किडनी प्रत्यारोपणाचा फटका चार हृदयाच्या रुग्णांना बसणार हे स्पष्ट आहे. रुग्णांचा संभाव्य धोका टाळण्याकरिता शासन सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया गृहासह आवश्यक डॉक्टरांसह मनुष्यबळ केव्हा देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रोज सुमारे २ अशा आठवडय़ात १२ हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात. राज्यातील मुंबईसह इतर रुग्णालयातील बायपास शस्त्रक्रियेची संख्या बघता नागपूरचाही वरचाच क्रमांक लागतो. नागपूरला एन्जोग्राफीसह इतरही हृदयाच्या सगळ्याच शस्त्रक्रिया उपलब्ध आहे, हे विशेष.

शासनाकडे पाठपुरावा -डॉ. श्रीगिरीवार
सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सीव्हीटीएस शस्त्रक्रिया गृहात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याकरिता र्निजतुकीकरणासह बऱ्याच बाबी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी कराव्या लागतात. त्यामुळे तीन दिवस हृदयाच्या शस्त्रक्रिया करता येत नाही, परंतु शासनाकडे किडनीग्रस्तांकरिता स्वतंत्र शस्त्रक्रिया गृहासह आवश्यक मनुष्यबळासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी दिली.