देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना शहीद जवानाच्या पत्नीची टिका

देशात काही लोक मनात येईल तसे देशाच्या विरोधात बोलत आहे. त्याने देशाच्या सीमेवरील जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या मनावर निश्चितच वाईट परिनाम होतो. जर कुणाला देशाबद्दल चांगले बोलता येत नसेल, तर त्यांनी वाईटही बोलू नये, असा टोला देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना भावना गोस्वामी यांनी लगावला. त्यात देशाच्या सीमेवर अतिरेक्यांशी दोन हात करतांना शहीद झालेल्या लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी यांच्या पत्नी आहेत.

नागपूरला एका कार्यक्रमाकरिता आल्यावर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. भावना गोस्वामी म्हणाल्या की, माझे पती देशाच्या २ पॅरा कमांडो बटालियनमध्ये होते. १ ऑगस्ट २०१५ च्या सुमारास ते सुट्टीवर उत्तराखंडातील गावी आले. १२ ऑगस्टला त्यांनी भूमिका या मुलीचा आठवा वाढदिवस साजरा केला. दोन दिवसांनी ते १५ ऑगस्टला लवकरच सुट्टी मिळाल्यावर परत येण्याचे आश्वासन देत सेवेवर निघून गेले. सुमारे दोन आठवडय़ांनी ते काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ात अतिरेक्यांशी दोन हात करीत शहीद झाल्याची माहिती मिळाली. हे एकून घरातील सासू, जेठ, जेठानीसह आम्ही सगळे थक्कच झालो.

याप्रसंगी देशाचे रक्षण करण्याकरिता त्यांनी स्वतचे प्राण देत दोन अतिरेक्यांना ठार मारण्यासह दोन अतिरेक्यांना जखमी करून तीन भारतीय जवानांचे प्राणही वाचवल्याचे कळले. पतीच्या जाण्याचे दुख असले तरी देशाकरिता त्यांनी बलिदान दिल्याचा मला अभिमानही आहे. मुलीला डॉक्टर करण्याची पतीची इच्छा होती. तेव्हा मुलीला चांगले शिक्षण देऊन डॉक्टर करून तिलाही सैन्यात नोकरीसाठी प्रोत्साहित करेल. मला सध्या उत्तराखंड सरकारकडून नोकरीचे प्रस्ताव मिळाले आहेत. तेव्हा लवकरच ते करून स्वतच्या पायावर उभे राहणार आहे.

सध्या काही लोकांकडून देशाच्या विरोधात वाईट बोलले जात असल्याबद्दल दुख होते. ज्या व्यक्तीने स्वतच्या कुटुंबातील कुणाला गमावले त्यालाच देशातील शहिदांचे दुख कळणे शक्य आहे, असे सांगून, घरात सासऱ्यांनीही आसाम रायफल्समध्ये सेवा दिली असून त्यांचा सेवानिवृत्तीनंतर अपघातात मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी त्यांची मुलगी भूमिकाही उपस्थित होती.