गैरप्रकार करणाऱ्यांना सेवामुक्ती; महावितरणचा प्रयोग

वीज चोराला मदत किंवा ग्राहक मीटरच्या चुकीच्या नोंदी घेणाऱ्या महावितरण नियुक्त खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकरिता नोकरीची दारे कायमची बंद होणार आहेत. महावितरणकडून विदर्भात हा पथदर्शी प्रयोग सुरू करण्याकरिता कर्मचाऱ्यांना आधार सक्ती करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यभरात त्याची अंमलबजावणी होईल.

मुंबईचा काही भाग वगळता राज्यातील कोटय़वधी ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवठा होतो. महावितरणने वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना मदत करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांसह ग्राहक मीटरच्या चुकीच्या नोंदी घेणाऱ्या एजन्सीवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वीजचोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होत आहे. त्यातून वीजचोरीसाठी मदत करणाऱ्या कंत्राटदार वा कर्मचाऱ्यांचे नाव पुढे येत आहे. सोबतच खासगी एजन्सीने घेतलेल्या वीज मीटर नोंदीपैकी ५ टक्के मीटरची पुनर्तपासणी महावितरण करत आहे.एजन्सीच्या चुकीच्या नोंदणीचा भरुदड महावितरणसह अप्रत्यक्षपणे वीज ग्राहकांना बसतो. ग्राहकांची चूक नसताना त्यांना वारंवार देयकात दुरुस्तीकरिता वीज कंपन्यांमध्ये चकरा माराव्या लागतात.या प्रकाराला एजन्सीचा कर्मचारी जबाबदार आहे. एजन्सीचे काम महावितरणने बंद केल्यास दुसऱ्या एजन्सीकडूनही त्याच एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना घेतले जाते. त्यामुळे गैरकारभार सुरूच असतो. यावर चाप लावण्यासाठी नागपूर प्रादेशिक कार्यालयाने नवीन पद्धतीवर काम सुरू केले आहे. त्यानुसार त्यांच्याकडे काम करणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक प्रशासनाने नोंदवले आहे.

कर्मचाऱ्याने चुकीचे काम केल्यास त्वरित त्याची नोंद आधार क्रमांकासह या प्रणालीत होईल. त्यानंतर आधार क्रमांक ब्लॉक केला जाईल. त्यामुळे पुन्हा त्याला महावितरणशी संबंधित एजन्सीत काम मिळणार नाही.

महावितरण आणि त्यांच्याशी संबंधित एजन्सीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आधार क्रमांक नोंदवले आहे. कर्मचाऱ्याने चुकीचे काम केल्यास त्याचा आधार क्रमांक ब्लॉक केला जाईल. त्यामुळे पुन्हा त्याला सेवेवर घेतले जाणार नाही.

भालचंद्र खंडाईत, प्रादेशिक संचालक, महावितरण, नागपूर.