आम आदमी पार्टीचे अभिनव आंदोलन
शहरातील रस्त्यांवरील खड्डे नागपूरकरवासीयांच्या डोकेदुखीचा विषय ठरला असताना त्याला आता राजकीय रंगही चढू लागला आहे. आम आदमी पार्टीतर्फे शनिवारी खड्डय़ांच्या विरोधात अभिनव आंदोलन करण्यात आले. प्रमुख रस्त्यांवर वृक्षारोपण करून त्यांना भाजप नेत्यांची नावे देण्यात आली. शहरातील खड्डय़ांच्या प्रश्नाकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे ‘बाईक रॅली’ काढण्यात आली. दुपारी ४ वाजता निघालेली ही रॅली संविधान चौक, सिव्हील लाईन्स, बैद्यनाथ चौक, मेडिकल चौक, क्रीडा चौक, रेशीमबाग चौक, अशोक चौक, अग्रसेन चौक, कमाल चौक, इंदोरा चौक फिरून पक्षाच्या कार्यालयात विसर्जित झाली. यात बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. रस्त्यावरील खड्डय़ात झाडे लावून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नावे देण्यात आली.
महापौर, आयुक्त, कंत्राटदारांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार
खड्डय़ांसाठी महापालिकेला दोषी धरून आम आदमी पार्टीने पाचपावली, धंतोली आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि कंत्राटदार यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप पक्षाचे देवेंद्र वानखडे, अशोक मिश्रा यांनी केला आहे.