नागपूर : पाणी फाऊंडेशनच्या कामानिमित्त जिल्ह्यत आलेला अभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी उमरेड-करांडला अभयारण्याला भेट दिल्याची चर्चा आज, बुधवारी दिवसभर होती. समाजमाध्यमांवर त्या दोघांचेही जंगलातले छायाचित्र प्रसिद्ध झाले. या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी अभयारण्य प्रशासनाला विचारले असता निश्चित उत्तर कुणीही दिले नाही.

अभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव हे पाणी फाऊंडेशनच्या कामानिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. मंगळवारी ते नागपुरात होते. त्यानंतर आज या दाम्पत्याचे समाजमाध्यमांवर  जंगलातील छायाचित्र झळकले. त्याची शहानिशा करून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘हो’ आणि ‘नाही’ अशी दोन्ही उत्तरे मिळाली. मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांनी हे दाम्पत्य अभयारण्यात आले नसल्याचे सांगितले, तर क्षेत्र संचालक गोवेकर यांनीही अशी चर्चा असून निश्चित काहीही माहिती नसल्याचे सांगितले. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी करांडला गावात ते आले असावेत आणि गर्दी होऊ नये म्हणून कुणाला सांगितले नसावे, असे ते म्हणाले. दरम्यान, आमदार सुधीर पारवे यांनी विमानतळावर आमिर खान व किरण राव यांची भेट झाल्याचे सांगितले. अकोला तालुक्यात ते जाणार होते तेव्हा उमरेड-करांडला येण्याचे निमंत्रण मी त्यांना दिले होते. ते अभयारण्यात येऊन गेल्याची माहिती नंतर कळली, असे ते म्हणाले.