भारतातील व्याघ्रसंख्येच्या ताज्या अहवालानुसार, एकूण व्याघ्रसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश वाघांचे वास्तव्य भारतातील ५० व्याघ्रप्रकल्पांच्या बाहेर आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या अभ्यासानुसार ६५ टक्के वाघ हे व्याघ्रप्रकल्पाच्या आत तर उर्वरित वाघ हे लगतच्याच वनक्षेत्रात  आढळून आले आहेत. व्याघ्रप्रकल्पाचा वापर करणाऱ्या वाघांपासून तर व्याघ्रप्रकल्पातील वाघांपेक्षा वेगळे वाघ असे त्याचे वर्णन केले आहे.

भारतातील सुमारे एक तृतीयांश वाघ हे अशा क्षेत्रात वास्तव्यास आहेत, जे क्षेत्र वाघांसाठी सुरक्षित नाही. २०१८च्या अभ्यासानुसार, भारतात दोन हजार ९६७ वाघ असून त्यांनी सुमारे ८८ हजार ९८५ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. कॅमेरा ट्रॅपच्या आधारावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्थेने हा अंदाज मांडला आहे. व्याघ्रप्रकल्पाला कठोर सीमा नाहीत, पण मोठय़ा जंगलांमध्ये हे क्षेत्र सामावले असते. सुरक्षित क्षेत्राच्या सीमेपलीकडे वाघ राहात असले तरीही बरेचदा हे क्षेत्र व्याघ्रप्रकल्पालगत असल्यामुळे ते  सुरक्षित क्षेत्रात येऊन जातात. व्याघ्रप्रकल्पाबाहेरील वाघांच्या अस्तित्वामुळे वाघांच्या भ्रमणमार्गाचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच ते विविध अधिवासात पसरले आहेत, यावरही शिक्कामोर्तब होते, असे या अभ्यासात म्हटले आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह पेंच, कार्बेट, दुधवा, बांधवगड, मुदुमलाई, नगरहोल, बांदीपूर आणि सत्यमंगलम या  प्रकल्पात वाघांची संख्या मोठी आहे. मात्र, याच व्याघ्रप्रकल्पालगतच्या क्षेत्रात वाघ मोठय़ा संख्येने आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक वनखात्यात संरक्षित क्षेत्राबाहेर असणाऱ्या वाघांची संख्या अधिक आढळून आली. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या ब्रम्हपुरी वनविभागात मोठय़ा संख्येने वाघ आहेत. म्हणूनच याठिकाणी मानव-वन्यजीव संघर्षही मोठय़ा प्रमाणात आहे. व्याघ्रप्रकल्पाबाहेर मोठय़ा संख्येने आढळणारे वाघ महत्त्वाचे आहेत. कारण दोन क्षेत्राची संलग्नता ते निश्चित करतात आणि या प्रजातीच्या जनुकीय देवाणघेवाण व अस्तित्वासाठी ते महत्त्वपूर्ण असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. व्याघ्रप्रकल्पाबाहेर वाघांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने यातून वाघांच्या भ्रमणमार्गाचे महत्त्व वाढेल आणि त्याचे संरक्षण होईल, असे देखील या अभ्यासात म्हटले आहे.