राज्याच्या उपराजधानीला नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांपासून धोका होण्याची शक्यता असतानाही त्यावर मात करण्यासाठी सक्षम असे आपत्कालीन व्यवस्थापन धोरण स्थानिक पातळीवर तयार नाही. शहराच्या सीमेवरच गॅस आणि पेट्रोलचे डेपो, स्फोटक आणि रसायनांचे कारखाने आहेत. याशिवाय मिहानमध्ये असे अनेक प्रकल्प भविष्यकाळात येऊ घातले आहेत. भूकंप आणि पुराची अनुभूती या शहराने घेतली आहे. अशा परिस्थितीत पुलगावसारखी घटना नागपुरात घडल्यास मोठय़ा प्रमाणावर जीवित हानी होण्याचा धोका आहे.
२००४च्या त्सुनामीनंतर सरकार जागृत झाले आणि जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग सुरू करण्यात आला. मात्र, नागपुरातील या विभागाची कार्यशैली अजूनही प्रश्नांकित आहे. या विभागाची सध्याची अवस्था म्हणजे या विभागालाच आपत्कालीन व्यवस्थापनाची गरज आहे की काय अशी आहे. पुरेसे मनुष्यबळ नाही, असलेले प्रशिक्षित नाही आणि दिशा देणारा अधिकारी नाही. या विभागाचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनासाठी कमी आणि इतर कामांसाठीच अधिक आहे. अशा परिस्थितीत शहरात पुलगावसारखी परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना हा विभाग करू शकत नाही. महानगरपालिकेत अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, पण साहित्य पुरेसे नाही. एकाचवेळी दोन ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करणे शक्य नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नावापुरता असल्याने सर्व भिस्त पालिकेवर आहे. मात्र, शहराची भिस्त सांभाळणारी महानगरपालिका जिल्ह्याची व्यवस्था सांभाळण्यास सक्षम नाही. शहरातील वर्धा मार्गावर एलपीजी गॅस, पेट्रोलचे डेपो आहेत. तर अमरावती मार्गावर अंबाझरी दारूगोळा कारखान्यासह वाडी परिसरातसुद्धा स्फोटकांचे छोटेमोठे कारखाने आहेत. शहराच्या सीमेबाहेर काही वर्षांपूर्वी हे कारखाने आणि डेपो उभारले गेले.

शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापनसुद्धा सक्षम कसायला हवे. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन असले तरीही ग्रामपंचायत स्तरावर ते स्थापन झाले तरच त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक राष्ट्रीय महामार्ग शहराला लागून आहेत आणि या प्रत्येक महामार्गाच्या प्रवेशद्वारावर आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा असायला हवी. स्फोटके, रसायने, गॅसच्या विळख्यात असलेल्या या शहराला ‘एरियल’ आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे. मात्र, स्थानिक पातळीवरचे आपत्ती व्यवस्थापनच सक्षम नसताना ‘एरियल’ आपत्ती व्यवस्थापनाची अपेक्षा बाळगली जाऊ शकत नाही.
– अमोल खंते, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक व संचालक सीएसी ऑलराउंडर.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वसामान्य जनजागृती हा सर्वात मोठा भाग आहे. पुलगावसारखी दुर्घटना उद्भवल्यास किंवा तशी घटना उद्भवू नये म्हणून प्राथमिक उपायांची माहिती सर्वसामान्यांना असणे गरजेचे आहे. घटना घडली म्हणून कारखाना हटवायचा किंवा डेपो हलवायचा हा त्यावरचा पर्याय नाही. याशिवाय अशा कारखाना, डेपोची नियमित पाहणी, जनजागृती, कारखान्यांचे ‘ऑडिट’ या नियमित गोष्टींचीही तेवढीच गरज आहे. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ पुरापुरते मर्यादित नको, तर ते सर्वच स्तरावर असायला हवे.
-अपरुप अडावदकर, माजी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नागपूर जिल्हा