ऑनलाइन परीक्षेतील नवा घोळ

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकालातील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. बी.एस्सी.च्या एका विद्याथ्र्याने ऑनलाईन परीक्षा दिली असून त्याला पेपर जमा झाल्याचा संदेशही प्राप्त झाला. असे असतानाही निकालामध्ये त्याला अनुपस्थित दाखवण्यात आले.

विशेष म्हणजे, विद्यापीठाने परीक्षेला अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये त्याच्या नावाचा  उल्लेख नसताना त्याच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित दाखवण्यात आल्याचे विद्याथ्र्याने सांगितले. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली असता ते महाविद्यालयाकडे बोट दाखवत असल्याचा आरोप विद्याथ्र्याने केला आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही त्यांच्या उत्तरपत्रिका जमा झाल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून ती महाविद्यालयाला पाठवली. शिवाय या यादीमध्ये नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षाही घेण्यात आली. मात्र, या यादीत नाव नसणे म्हणजे संबंधित विद्याथ्र्याने परीक्षा दिली असा होतो. असे असतानाही विद्यापीठाने त्याला अनुपस्थित दाखवल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

घोळ काय?

बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या शुभम क्षीरसागर या माजी विद्याथ्र्याचे दोन विषयाचे पेपर होते. विद्याथ्र्याच्या सांगण्यानुसार, त्याने दोन्ही विषयाची परीक्षा दिली असून  पेपर जमा झाल्याचा अंतिम संदेशही आला. त्याचे स्क्रीन शॉटही विद्याथ्र्याकडे आहेत.  याशिवाय विद्यापीठाने परीक्षेत अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात शुभमचे नाव नव्हते.  मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या बी.एस्सी.च्या निकालात शुभमला दोन्ही विषयात अनुपस्थित दाखवण्यात आले. शुभमने वारंवार परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी महाविद्यालयाला दोषी ठरवले, तर काही अधिकाऱ्यांनी परीक्षा संचालकांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.