राष्ट्रीय अधिवेशनाकरिता निधी संकलनासाठी मद्यालयांना साकडे

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : ज्ञान, शील, एकतेचे ब्रीद मिरवणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनाकरिता निधी संकलनासाठी चक्क मद्यालये पालथी घालणे सुरू केले आहे. समाजातील विविध घटकांसोबतच मद्यालयांतून गोळा झालेल्या निधीद्वारे ते ‘अभाविप’ सदस्यांचे ‘बौद्धिक’ सिंचन करणार आहेत. संस्कारित पिढी घडवण्याचा दावा  करणाऱ्या या संघटनेला वगर्णीसाठी  मद्यालयाचा उंबरठा ओलांडावा लागल्याने या संघटनेच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली जात आहे.

स्वामी विवेकानंदांना आदर्श मानणारी अभाविप ही भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी शाखा असून येथील बहुतांश कार्यकर्ते हे संघाच्या संस्कारात तयार होतात. मात्र, या संघटनेकडून निधी संकलनासाठी चालवलेली मोहीम एकूणच संघटनेच्या ब्रीद वाक्याला, संघ शिस्तीला व संस्कारालाही तडा देणारी ठरली आहे. तब्बल २५ वर्षांनंतर अभाविपचे यंदाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात २५ ते २७ डिसेंबरदरम्यान होणार आहे. रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरात होणाऱ्या या अधिवेशानाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. त्याकरिता अभाविपने नागपूर शहरात १ डिसेंबरपासून लघुनिधी संकलन अभियान सुरू केले आहे. यासाठी अभाविपचे कार्यकर्ते शहरात  निधी गोळा करीत आहेत. या क्रमात आज सोमवारी अभाविपच्या काही कार्यकर्त्यांनी चक्क मद्यालये गाठून तेथील व्यवस्थापकाला निधीसाठी आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे, निधी गोळा करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अभाविपला निधी गोळा करण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असून करोनाकाळातील त्यांचे सेवाकार्य अनेकांसाठी आदर्श आहेत. असे असतानाही ही संघटना राष्ट्रीय अधिवेशनाच्या निधीसाठी  मद्यालयाची मनधरणी करीत असल्याने संतापजनक आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन लाखांवर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सहभाग

करोनामुळे  परवानगी न मिळाल्याने केवळ केंद्रीय कार्यसमितीचे सदस्य रेशीमबागेत प्रत्यक्ष सहभागी होतील. तर देशभरातील २ लाखांवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन  सहभागी होतील. याशिवाय करोनाकाळातील अभाविपचे काम आणि देशाची स्थिती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, देशाची वर्तमान स्थिती आणि देशाची शैक्षणिक स्थिती या विषयांचा अधिवेशनात चर्चा होणार आहे.

विद्यार्थी परिषद  समाजातील प्रत्येक घटकाकडून निधी गोळा करून अधिवेशन यशस्वी करते. शहरातील  पंक्चरवाला, रिक्षावाला या छोटय़ा घटकाकडूनही निधी गोळा करण्यात आला. निधी संकलनासाठी निघालेल्या चमूने त्यांच्या विवेकबुद्धीनुसार त्या त्या दुकानातून निधी गोळा केला. मात्र, परिषद कुणाच्या पैशांवर काम करत नाही. ही विद्यार्थी आणि समाजहितासाठी कायम तत्पर असणारी संघटना आहे.

– रवी दांडगे, प्रदेश मंत्री, अभाविप.