आमिर खानच्या ‘असहिष्णुते’वरील वक्तव्यामुळे देशभरात कल्लोळ माजला असताना नागपुरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही जोरदार निदर्शने करून आमिर खानचा पुतळा जाळून निषेध केला.
सहा महिन्याआधी इन्क्रेडिएबल इंडिया असलेला भारत देश असहिष्णू कसा झाला, असा प्रश्न अभाविपच्यावतीने उपस्थित करण्यात आला. आमिर खानला ज्या देशाने घडवले त्याच देशाबद्दल अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे देशाचा आणि देशवासीयांचा अपमान होय. त्यामुळे असा अपमान अभाविप मुळीच खपवून घेणार नसल्याचे विद्यार्थी नेत्यांनी भाषणातून सांगितले. आमिर खानने देशाची माफी मागावी. तसे न केल्यास येणाऱ्या काळात अभाविप त्याचे येणारे चित्रपट चित्रपटगृहात लागू देणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला.
आज केलेल्या निदर्शनात अभाविपचे सरचिटणीस गौरव हरडे, पार्थ तेलपांडे, निशांत मोगरकर, वैभव बावनकर, अंकुश कुलरकर, रवी दांडगे, कौस्तुभ मुरमाळे आदींचा समावेश होता.