शहरात सात महिन्यांत ८ जणांचा बळी

वीज यंत्रणा भाग ३

नागपूरचा स्मार्ट सिटी योजनांतर्गत समावेश झाल्याने शहरातील वीज यंत्रणा स्मार्ट करण्याचे जोरदार प्रयत्न महावितरणसह एसएनडीएल या दोन्ही वीज वितरण कंपन्यांकडून होणार आहेत. योजनांतर्गत शहरातील सगळ्या वीज वाहिन्या भूमिगत होऊन प्रत्येक बाबी अद्यावत होणार असल्याने त्यातील मानवी हस्तक्षेप टळणार असल्याने मोठय़ा प्रमाणावर होणारे मानवी व प्राण्यांचे मृत्यू टळतील. त्याने शहरातील वीज चोरीही नियंत्रणात येणार असून विजेचा खर्च कमी होऊन प्रसंगी वीजदरही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपूरच्या सुमारे ४० लाख नागरिकांना ‘एसएनडीएल’सह महावितरण या दोन कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. या दोन्ही कंपन्यांकडून शहरातील सवासहा लाख वीज ग्राहकांना रोज ४५० मेगा व्हॅटहून जास्त विजेची गरज भासते. शहरात आजही अनेक वस्त्या जुन्या असून, बाजार गजबजलेले, जुनाट पद्धतीची वीज यंत्रणा अनेक भागात बघायला मिळते. जुन्या शहरात मोडणाऱ्या मध्य, उत्तर, पूर्व नागपुरात मोठय़ा प्रमाणावर दाट लोकवस्ती असल्याने या भागात सर्वाधिक गुंतागुंतीचे वायरिंगसह अनेक वीज यंत्रणेतील दोष आजही बघायला मिळतात. दाट वस्त्यांमध्ये आजही उघडय़ा वायरिंगमध्ये मोठय़ा प्रमानावर जोड असल्याचेही चित्र आहे. या वायरिंगमध्ये पाऊस पडल्यावर वीजप्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच नागपूरला १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०१५ या सात महिन्यात तब्बल ८ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात एसएनडीएल भागातील ६, तर महावितरण हद्दीतील २ मृत्यूंचा समावेश आहे. पैकी बहुतांश मृत्यू नागरिकांसह संबंधित संस्थांनी त्यांच्या वीज यंत्रणेत दोष ठेवल्याने झाले असले तरी ही संख्या मोठी आहे. या कालावधीत विजेच्या धक्क्याने दोन्ही कंपन्यांच्या हद्दीत तब्बल २३ मुक्या जनावरांचा तडफडून मृत्यू झाला आहे. पैकी सर्वाधिक १६ प्राण्यांचा मृत्यू १८ सप्टेंबर २०१५ मध्ये जरीपटका भागात झाला आहे. या सगळ्यांचा जीव वाचण्याकरिता वीज यंत्रणेत मानवी वा प्राण्यांचा हस्तक्षेप कमी होण्याची गरज आहे.
स्मार्ट वीज यंत्रणेत सगळ्या वीज वाहिन्या भूमिगत होण्यासह विविध उपकेंद्र अद्यावत होऊन यात मानवी व प्राण्यांचा हस्तक्षेप कमी होणार असल्याने निश्चितच हे मृत्यू नियंत्रणात येण्याची दाट शक्यता आहे, परंतु या मृत्यू नियंत्रणाकरिता शहरातील प्रत्येक घरातील वीज यंत्रणाही नियमानुसार करून घेण्याची जबाबदारी शासनासह महापालिका प्रशासनावर असणार आहे. तसे न झाल्यास वीज कंपनीची यंत्रणा कितीही सक्षम झाल्यावरही घरातील वीज यंत्रणेतील दोषाने अपघात वाढून अनेकांचा जीव जाण्याचे सत्र सुरूच राहील.
सोबत शहराच्या अनेक भागात सध्या मोठय़ा प्रमाणावर उघडय़ावरून वीज तारा जात असल्याने अनेक भागात आकोडा टाकून वीजचोरी होतांनाही दिसते. सोबत उघडय़ा वीज तारेत तांत्रिक वीज हानीही जास्त होते. दोन्ही वीज हानी बघता हे प्रमाण शहरात १८ टक्क्यांच्या आसपास असल्याचे बोलले जाते. निश्चितच त्याने वीज कंपनीला प्रत्येक वर्षी कोटय़वधींचा फटका बसतो. स्मार्ट सिटी योजनांतर्गत वीज तारेवर आकोडा टाकून होणाऱ्या वीजचोरीसह मिटरमध्ये छेडछाड करून होणारी वीजचोरी थांबणार असल्याने निश्चितच शहराचे प्रत्येक महिन्याला चार कोटीहून जास्त रुपये वाचणार असल्याचे बोलले जाते. तसे झाल्यास शहरातील विजेचा खर्च कमी होऊन प्रसंगी वीज दरही कमी होण्याची शक्यता आहे, परंतु त्याकरिता लोकप्रतिनिधींकडून वेगळे प्रयत्न होण्याची गरज आहे.

प्रत्येक इमारतीचे अंकेक्षण
गरजेचे -नितीन गिरी
स्मार्ट सिटी योजनांतर्गत शहरात वीज अपघात नियंत्रणाकरिता अनेक महत्वाचे पावले उचलण्याची गरज आहे. याकरिता निश्चित कालावधीनंतर शहरातील प्रत्येक शासकीय व खाजगी इमारतीचे वेळोवेळी वीज अंकेक्षण करण्याची सक्ती करायला हवी. त्याने वेळीच वीज यंत्रणेतील दोष सगळ्यांच्या निदर्शनात येऊन त्याच्या होणाऱ्या दुरुस्तीने भविष्यातील अपघात टाळणे शक्य होईल, असे मत अमरावती रोड येथील रहिवासी नितीन गिरी यांनी व्यक्त केले.

वीज कर्मचाऱ्यांनाही स्मार्ट
करण्याची गरज -डॉ. गिरीश भुयार
नागपूरची वीज यंत्रणा अद्यावत करतांनाच वीजसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही स्मार्ट करण्याची गरज आहे. त्याकरिता शहरातील सगळ्या कायम व कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना संगणकाचे ज्ञान, वीज ग्राहकांशी बोलण्याचे कौशल्य, वीज यंत्रणेतील अद्यावत प्रणालीची दुरुस्ती, स्वत अपघातापासून वाचण्याकरिता दुरुस्तीच्या दरम्यान घ्यायच्या काळजीसह अनेक बाबींचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे मत डॉ. गिरीश भुयार यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यातही वीज यंत्रणा
सुरक्षित रहावी -संदीप लाडे
पावसाळ्यात शहरात अचानक जोरदार पाऊस पडल्यास खोलगट भागातील अनेक वीज उपकेंद्र, रोहित्र, वितरण पेटी पाण्यात जातात. तेव्हा हजारो वीज ग्राहकांचा पुरवठा खंडीत होतो. स्मार्ट सिटी योजनांतर्गत वीज वाहिन्या भूमिगत होणार असल्या तरी पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबून वीज पुरवठा खंडीत होऊ नये, याकरिता विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे मत संदीप लाडे यांनी व्यक्त केले.