चिंचभुवन पुलावरील मध्यरात्रीची घटना

‘आज का दु:ख, कल का सुख’ असे म्हणून शहरातील लोकांना सहकार्य करण्यासाठी विनंती करणारी मेट्रो आता अनेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमुळे अनेक अपघात होत असून नागरिकांसह मेट्रोच्याच कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होत आहे. मंगळवारी मध्यरात्री सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचभुवन रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा ट्रेलरखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये मेट्रोच्या कामाविषयी प्रचंड रोष आहे.

वैभव प्रभाकर गाडेकर (१९) रा. नवीन सुभेदार ले-आऊट, सक्करदरा असे मृताचे नाव आहे. वैभव हा मेट्रोमध्ये मार्शल म्हणून कामाला होता. खापरी येथील मेट्रोच्या डेपोमध्ये गर्डर तयार करण्यात येतात. रात्रीच्या सुमारास ते शहरात मेट्रोच्या कार्यस्थळी पोहोचवले जाते. त्यासाठी मोठय़ा ट्रेलरचा वापर केला जातो. ट्रेलरमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहनासोबत  मार्शल (वाहतूक वार्डन)  असतो. मंगळवारी रात्री वैभवकडे एनएल-०२, एन-१३२५  क्रमांकाच्या ट्रेलरची जबाबदारी होती. रात्री ते खापरी डेपोतून गर्डर घेऊन निघाले. चिंचभवन पुलावर ट्रेलर चढला असता वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे  वैभव हा इतर वाहनांना मार्ग दाखवण्यासाठी ट्रेलरखाली उतरला. जवळपास सर्व वाहने निघून गेली व ट्रेलर एका जागी थांबलेला होता. दरम्यान, एक कार वेगाने येताना दिसल्याने वैभव मागे सरकला. त्याचवेळी ट्रेलरच्या चालकानेही ट्रेलर सुरू करून समोर घेतल्याने वैभव चाकात सापडला व त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत मेट्रोमुळे झालेले अपघात

शहराच्या विकासात भर घालणाऱ्या मेट्रोच्या कामांमुळे अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. १० ऑक्टोबरला सीए मार्गावर मेट्रोमुळे दोन महिला आणि एक चिमुकल्या मुलाचा गंभीर अपघात झाला होता. त्या प्रकरणात मेट्रोने दोन अभियंत्यांना निलंबित केले होते. त्यानंतर सीताबर्डीतील मेट्रोच्या पिलरचा लोखंडी सापळा कोसळला होता. मात्र, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर काँग्रेसनगर परिसरात मेट्रोच्या कामामुळे अरुंद असलेल्या रस्त्यावर सिमेंट मिक्सरच्या खाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर ३० मार्चला मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनमुळे अभियंत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पुन्हा मेट्रोच्या वाहनामुळे अपघात झाल्याने मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत अजून किती जणांचा बळी जाईल, असा सवाल आता नागपूरकर विचारू लागले आहेत.