कळमेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत डोरली भिंगारी येथे झालेल्या अपघातात रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एक महिला जागीच ठार, तर दुसरी गंभीर जखमी झाली. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी वाहनचालकाच्या घरावर दगडफेक करून घरासमोरीला स्कुटीला, त्याच्या दुकानाला व दिलेली गाडी सुद्धा आग लावली.

डोरली भिंगारी येथील नीलिमा दादाराव नागपुरे (३८) व चंद्रकला लोखंडे (३५) या महिला जेवण झाल्यानंतर रात्री १०.३० वाजत्याच्या सुमारास रस्त्याने फिरायला गेल्या असता समीर मेश्राम (२४,रा. डोरली) याने आपली महिंद्रा मॅक्स (एम.एच. ३१-डीएस ७९४) ही गाडी भरधाव नेत असताना या महिलांना जबर धडक लागली. यात नीलिमा नागपुरे जागीच ठार, तर चंद्रकला लोखंडे गंभीर जखमी झाल्या. त्यांना शासकीय रुग्णालयात तात्काळ पाठवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी महिद्रा मॅक्सचालक समीर मेश्राम याच्या घरावर प्रथम हल्ला करून दगडफेक केली व घरासमोर असलेल्या स्कुटीला आग लावली. त्यानंतर हा संतप्त जमाव त्याच्या अमर किराणा दुकानाकडे वळला व दुकानालाही आग लावली. तसेच धडक दिलेली गाडी सुद्धा जमावाने पेटवून दिली.

या घटनेची माहिती कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांना मिळताच ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे हे लक्षात येताच त्यांनी सावनेर, खापा व केळवद येथील पोलीस कुमक मागवली व परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर महिंद्रा मॅक्सचा चालक समीर मेश्राम याला अटक करून जाळपोळ करणाऱ्या घटनेतील चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.