सरकारी यंत्रणा आणि गावकऱ्यांचे दावे-प्रतिदावे; यवतमाळ जिल्ह्य़ात खळबळ

यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील एका वृद्ध शेतकऱ्याने १४ एप्रिलला केलेल्या आत्महत्येने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांच्या आणि गावक ऱ्यांच्या मते शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात स्वत: सरण रचून आत्महत्या केली, तर पोलिसांच्या मते शेतातील पऱ्हाटीच्या ढिगाला (वाळलेली कापसाची झाडे) लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणा शेतकऱ्याच्या आत्महत्येला अपघात ठरवून आपले अपयश दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला आहे.

मागील आठवडय़ात घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकर चायरे या शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचे पडसाद देशभर उमटले होते. शंकरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. आता उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील ७६ वर्षांचे माधव शंकर रावते या शेतकऱ्याने १४ एप्रिलला आत्महत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माधव यांच्यावर ६० हजारांचे बँकेचे आणि काही खासगी सावकारांचे कर्ज होते. आत्महत्येपूर्वी बँकेत जाऊन माधव यांनी कर्जमाफीबाबत चौकशी केली. त्यांना बँकेने व्याजाची रक्कम भरण्यास सांगितले. त्यामुळे ते निराश झाले होते. त्यांच्याकडे ३.७५ एकर शेती आहे व त्यात यंदा अवघे ३ क्विंटल कापूस पीक आल्याने ते अडचणीत सापडले होते. एक मुलगा, सहा नातवंडे असा मोठा परिवार सांभाळण्याची आर्थिक विवंचना असह्य़ झाल्याने त्यांनी शेतातच सरण रचून त्यात होरपळून स्वत:ला संपवले. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतातील अग्निज्वाळा लोकांनी पाहिल्या. मुलगा गंगाधरने घटनास्थळी धाव घेतली असता वडिलांचा होरपळलेला देह त्याला दिसला.

ही घटना वाऱ्यासारखी गावात आणि जिल्ह्य़ातही पसरली आणि वेगवेगळ्या संघटनांनी गावाला भेटी दिल्या. बिटरगावचे ठाणेदार प्रकाश राऊत यांनी या प्रकरणी चौकशी केली. पऱ्हाटीच्या ढिगाला लागलेल्या आगीत होरपळून माधव यांचा मृत्यू झाला, असा त्यांचा दावा आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनीही ही आत्महत्या  नसल्याचे सांगितले.

पोलिसांच्या दाव्यावर आक्षेप

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील शेतक ऱ्याने आत्महत्या केल्याने ती दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आहे, असा आरोप करून शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी पोलिसांच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. माणूस आगीत सापडला तर तो बचावासाठी प्रयत्न करतो. माधव यांचा जिथे मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाला त्यावरून त्यांनी बचावासाठी काहीच प्रयत्न केल्याचे दिसून येत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचेच स्पष्ट होते. तलाठय़ाच्या माहितीवरून तहसीलदारांनी तयार केलेल्या अहवालातही माधव रावते यांनी आत्महत्या केल्याचे सकृद्दर्शनी दिसून येत असल्याचे नमूद केले आहे. गावकऱ्यांच्या समक्ष रावते यांच्या मुलानेही वडिलांनी आत्महत्या केली असे सांगितले होते, असे पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलीस एका खासगी वाहनातून साध्या वेशात सावळेश्वरला गेले होते. रावते यांच्या कुटुंबीयांना घेऊन जात असताना त्यांना शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी थांबवले. त्यामुळे पोलीस पुन्हा गावात परतले व रावते यांच्या घरी जाऊन त्यांनी चौकशी केली. ही बाब आक्षेपार्ह आहे, असा आरोप पवार यांनी केला. १२ तारखेला मुख्यमंत्री उमरखेडमध्ये आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी ही घटना घडली, त्यामुळे ती दडपण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.