मंगेश राऊत

गलथान अभियांत्रिकीचा नागपूरकरांना फटका

शहरातील अपघातप्रवण स्थळांची संख्या कमी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे. चुकीच्या अभियांत्रिकीकरणाचा हा फटका असून अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अशा अपघातप्रवण स्थळांना दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

केंद्रीय रस्ते व बांधकाम मंत्री विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी यांनी  एका संस्थेमार्फत शहरातील अपघातप्रवण स्थळांचा अभ्यास करायला लावले होते. त्यावेळी २४ अपघातप्रवण स्थळे होती व ती हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सांगण्यात आले होते. मात्र, स्थळांची संख्या कमी होण्याऐवजी वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात पार पडलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात गडकरी यांनी अपघातप्रवण स्थळांवरून अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले होते. अभियंते वातानुकूलित कक्षात बसून रस्त्यांचे आराखडे तयार करतात, अशी टीका त्यांनी केली होती. एकाच ठिकाणी मागील तीन वर्षांत किमान ५ अपघात होऊन कुणी जखमी किंवा मृत झाले असतील तर त्या स्थळांना अपघातप्रवण स्थळ घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्या आदेशानुसार शहरातील अपघातप्रवण स्थळांची यादी करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात अशी ३५ स्थळे आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, रिंगरोड आणि इतर रस्त्यांवरील अपघातप्रवण स्थळांचा समावेश आहे.

वाडी, आठवा मैल, वडधामना, कॅम्पस चौक धोकादायक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, ७ आणि ६९ शहरातून जातात. राष्ट्रीय महामार्ग क्रमाकं ६ वर अमरावती मार्गावरील आठवा मैल हे अपघातप्रवण स्थळ आहे. या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत ३५ अपघात घडले असून ३२ जण जखमी, तर २५ जणांचा मृत्यू झाला. वाडी टी-पॉईंट या ठिकाणी ५१ अपघात झाले असून ३५ जण जखमी व २१ जणांचा मृत्यू झाला. वडधामना येथे २२ अपघातांमध्ये ११ जण मृत्यू पावले, तर १६ जण जखमी झाले. महाराजबाग परिसरात ५ अपघात झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. कॅम्पस चौकात गेल्या तीन वर्षांत ७ अपघातांमध्ये ७ जणांचा मृत्यू व ३ जण जखमी झाले.

जुना पारडी नाका सर्वाधिक असुरक्षित

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या भंडारा मार्गावरील जुना पारडी नाका येथे शहरातील सर्वाधिक अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत ६६ अपघात झाले असून ५० जण जखमी व १८ जणांचा मृत्यू झाला. या मार्गावर पारडीतील हनुमान मंदिराजवळ ११ अपघातात ९ जण जखमी झाले. प्रकाश हायस्कूलजवळ ७ अपघात झाले असून ६ जण जखमी व ४ जणांचा मृत्यू झाला.

हैदराबाद-नागपूर-जबलपूर महामार्गही चिंताजनक

हैदराबाद-नागपूर-जबलपूर या महामार्गावरही शहराच्या हद्दीत ८ अपघातप्रवण स्थळे आहेत. त्यापैकी डोंगरगाव येथे तीन वर्षांत ९ अपघातांमध्ये ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर १२ जण जखमी झाले.

छत्रपतीनगर येथे १६ अपघातांमध्ये १६ जखमी तर ३ तिघांचा मृत्यू झाला. छत्रपती चौकात ५ अपघातांमध्ये ५ जणांचा मृत्यू, दोघेजण जखमी झाले. परसोडी गाव येथे ५ अपघातांमध्ये ५ जण मृत्युमुखी पडले. एलआयसी चौक ते गड्डीगोदाम चौकादरम्यान ५ अपघातांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर दोन जखमींची नोंद आहे. कामठी मार्गावरील मारुती शो रुम चौकात यश मार्गावरील सर्वाधिक ४६ अपघातांची नोंद आहे.

त्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३७ जण जखमी झाले. उप्पलवाडी पुलाजवळ ३८ अपघात झाले. त्यात १० जण मृत्युमुखी पडले, तर ३४ जण जखमी झाले. पागलखाना ते मानकापूर दरम्यान ४ अपघातांची नोंद असून ४ जणांचा मृत्यू झाला व एक जखमी झाला.

शहरात अपघाताप्रवण स्थळांची यादी तयार करून ती सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केली आहे. रस्त्यांच्या बांधकामातील दोष दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अपघातप्रवण स्थळांवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी गतिरोधक बसवणे, सिग्नल बसवणे, वाहतूक फलक लावणे, झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर लावणे, प्रकाश व्यवस्था चांगली करण्याच्या अनेक सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या आहेत.

– राज तिलक रोशन, पोलीस उपायुक्त, वाहतूक.