19 October 2019

News Flash

पेट्रोल पंप, असमतोल रस्त्यामुळे अपघात

अपघातप्रवण स्थळांमध्ये मानेवाडा रिंगरोड चौक व म्हाळगीनगर चौकाचा समावेश आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मानेवाडा, म्हाळगीनगर चौकाबाबत निरीक्षण; वाहतूक विभागाने सुचवले उपाय

शहरातील काही अपघातप्रवण स्थळांमध्ये दुरुस्ती केल्यास त्या ठिकाणी अपघात टाळले जाऊ शकतात. अशाच अपघातप्रवण स्थळांमध्ये मानेवाडा रिंगरोड चौक व म्हाळगीनगर चौकाचा समावेश आहे. मानेवाडा चौकातील पेट्रोल पंप व म्हाळगीनगर चौकातील असमतोल रस्त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात अपघात होत असून त्यात मृत्यू पावणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. शहर व परिसरातील रस्त्यांचा विचार केल्यास एकूण ४५ अपघातप्रवण स्थळे असून या ठिकाणी काय दुरुस्ती आवश्यक आहे, यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी अभ्यास केला. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला तसा अहवाल किमान दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आला. पण, त्या बाबतीत कोणत्याच यंत्रणेकडून अपघातमुक्त रस्ते तयार करण्याकरिता प्रयत्नच झाले नाहीत. यात अनेक रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात लोकसत्ताने आठवा मैल, वाडी टी-पॉईंट, विद्यापीठ कॅम्पस चौक, ऑटोमोटिव्ह चौक आणि डोंगरगाव टोल नाका परिसरातील अपघातप्रवण स्थळासंदर्भात सविस्तर वृत्त दिले होते.

मानेवाडा चौकात गेल्या तीन वर्षांत ११अपघात झाले. त्यात १० जण जखमी झाले व ४ जणांचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी त्या चौकात महाविद्यालय तरुणी व एका महिलेलाही चिरडण्याची घटना घडली होती. वाहतूक विभागानुसार चौकात पेट्रोल पंप आहे आणि नागरिक पेट्रोल भारण्यासाठी पुढून वळण  न येता चौकातून विरुद्ध दिशेने गाडी दामटतात. त्यामुळे रिंगरोडवर वेगाने धावणाऱ्या ट्रकशी धडक होऊन अपघात घडतात. या चौकातील रस्ता असमान आहे. त्यामुळे रस्ता समतोल व समान करण्याची गरज आहे. रस्ता दुभाजक व रस्त्याच्या कडांना पेंटिंग करण्याची गरज आहे. चौकात पुरेशी प्रकाश व्यवस्था असायला हवी. रात्रीच्या अंधारात वाहनांना चौक दिसावे म्हणून झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाईनचे पट्टे आखण्यात यायला हवेत.

या चौकापासून काही अंतरावर असलेला म्हाळगीनगर चौकही अपघातप्रवण आहे. या चौकातील रस्ते खालवर आहेत. त्यामुळे प्रथम रस्ता समांतर असायला हवा. रस्ता खालवर असल्याने अनेकदा मोठय़ा वाहनांना छोटी वाहने दिसत नाहीत. परिसरात फुटपाथ दुरुस्तीची गरज आहे. शिवाय चौकात फुटपाथवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण असल्याने पादचारी रस्त्यावरूनच चालतात. फुटपाथ, रस्ता दुभाजक व चौकात पेंटिंग करण्याची गरज आहे. दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. चौकाचे क्षेत्रफळ कमी करण्याची सूचनाही वाहतूक विभागाने केली आहे. गेल्या तीन वर्षांत या चौकात १३ अपघात झाले असून १२ जण जखमी झाले. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला.

पारडी चौकाला अतिक्रमणाचा विळखा

नागपूर-कोलकाता महामार्गावर पारडी परिसरात तीन अपघातप्रवण स्थळ आहेत. यात पहिला जुना पारडी नाका असून त्या ठिकाणी तीन वर्षांत ६६ अपघात झाले. त्यात ५० जण जखमी तर १८ जणांचा मृत्यू झाला. पारडीतील हनुमान मंदिर परिसरात ११ अपघातांची नोंद आहे. याच मार्गावर प्रकाश हायस्कूलजवळ ७ अपघातांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. पारडी रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा असून अपघात कमी करण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची गरज आहे. जुना पारडी नाक्यावर झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाईन पट्टे आखायला हवेत. तर हनुमान मंदिरजवळ वाहतूक पोलीस नेमण्याची गरज आहे. प्रकाश हायस्कूल परिसरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने स्वयंसेवक नेमण्यात यावेत, दिशादर्शक फलक लावावेत तसेच तेथे गतिरोधक बसवण्याची सूचनाही वाहतूक पोलीस विभागाने केली आहे.

First Published on May 10, 2019 12:23 am

Web Title: accidents due to petrol pump imbalance road