सुरक्षित रस्ते बांधकामाची संकल्पना कागदावरच

गेल्यावर्षीच्या तुलनेत शहरात यंदा आतापर्यंत अपघातांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. पण, अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झाले नसल्याने सुरक्षित रस्ते बांधकामाची संकल्पना अद्यापतरी कागदावरच दिसत आहे.

जगभरात ‘शून्य अपघात’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांनी आपापल्या देशातील रस्ते सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण, भारतात अद्यापही रस्ते व अपघात या बाबीकडे विशेष गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येते. दररोज रस्ते अपघातात अनेकांचा जीव जातो. या अपघातांकरिता वाहनचालकांना दोष देण्यात येतो. पण, रस्त्यांची सदोष बांधणी करणाऱ्या यंत्रणेला कधीच दोषी धरले जात नाही.

गेल्या चार वर्षांपासून शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते आणि उड्डाणपुलांचे बांधकाम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे खोदले गेले असून त्याला सुरक्षित बॅरिकेटिंग करण्यात येत नाही किंवा स्वयंसेवक नेमण्यात येत नाही. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळेही अनेक अपघात होतात, पण कधीच त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. यंदाही अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्यावर्षीप्रमाणेच आहे. वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी जानेवारी ते ७ मे पर्यंत ३३९ गंभीर अपघातांची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत ३२७ अपघात घडले आहेत. याच कालावधीत २०१७ मध्ये ३४१ अपघात घडले होते. या अपघातांमध्ये २०१७ ते २०१९ या वर्षांमध्ये अनुक्रमे ८६, ८७ आणि ८६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू जुनी कामठीत

अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांचा पोलीस ठाणेनिहाय विचार केला असता जुनी कामठीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यांतर्गत २८ गंभीर अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर एमआयडीसी ७, हिंगणा ६, वाडी ५, यशोधरानगर आणि कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत आतापर्यंत प्रत्येकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे २२ गंभीर अपघात जरीपटका आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत घडले असून तेथे मृत्यू मात्र कमी आहेत.

नियम पाळण्याची आवश्यकता

सर्वाधिक अपघात घडणारे ठिकाण व पोलीस ठाण्याच्या परिसरातून राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. या महामार्गावर वाहनांची गती प्रचंड असते. शिवाय दुचाकी व पादचाऱ्यांनी काही नियम पाळण्याची गरज आहे. वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने न जाता काही अंतर समोर जाऊन यू-टर्न घेऊन परत यावे. पण, महामार्गावर चालताना दुचाकीस्वार किंवा जड वाहतूक करणारे अनेकदा विरुद्ध दिशेने गाडय़ा दामटताना दिसतात. तसेच पादचाऱ्यांनी  डावी व उजवीकडे बघूनच रस्ता ओलांडावा, असा नियम आहे. पण, नियमांकडे कुणीच लक्ष देत नाही आणि अपघातात जीव गमावतात.