वीज, पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना; आग प्रतिबंधक उपकरण असतानाही नोटीस

नागपूर : शहरात अशा अनेक जीर्ण इमारती आहेत ज्यांना महापालिकेने अधिकृतपणे धोकादायक जाहीर केले आहे. आता ज्या इमारतीत आगप्रतिबंधक उपकरणे नाहीत अशा इमारतींना धोकादायक ठरवले जात आहे. मात्र  गांधी विचाराला वाहून घेणाऱ्या सर्वोदय आश्रम संस्थेच्या इमारतीत ही यंत्रणा असतानाही केवळ त्याबाबतची जुजबी माहिती महापालिकेकडे सादर न केल्याने प्रशासनाने आश्रमाच्या इमारतीला धोकादायक ठरवून नोटीस बजावली आहे. तेथील वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देणारे पत्र १४ जानेवारी २०२० ला संबंधित विभागाला पाठवले आहे.

महापालिकेने सर्व इमारतींसाठी आग प्रतिबंधक उपकरणे लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार सर्वोदय आश्रम संस्थेनेही त्यांच्या अमरावती मार्गावरील इमारतीत सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून यंत्रणा बसवली. ती बसवताना संबंधित कंत्राटदाराकडून ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घ्यायचे असते. त्याची माहिती घेऊन ती महापालिकेकडे सादर करावी लागते. कंत्राटदाराने ही बाब संस्थेला न सांगितल्याने ही कार्यवाही झाली नाही. याचा आधार घेऊन महापालिकेने आश्रमाला नोटीस बजावली. त्यात ही इमारत व परिसर चक्क धोकादायक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे येथील वीज आणि पाणीपुरवठा खंडित करावा, अशा सूचनाही अग्निशमन विभागाने संबंधित विभागाला दिल्या आहेत.

यासंदर्भात संस्थेचे सचिव अ‍ॅड. वंदन गडकरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नोटीस मिळाल्याचे सांगितले. आम्ही आग प्रतिबंधक यंत्रणा लावली आहे. मात्र त्यानंतर त्याबाबतचे परिपूर्तता प्रमाणपत्र देण्याबाबत कंत्राटदाराने कल्पना दिली नाही. त्यामुळे ते महापालिकेकडे देणे राहिले. आता नोटीशीच्या अनुषंगाने सर्व बाबींची परिपूर्तता केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आगप्रतिबंधक उपकरणे न लावणाऱ्या सर्व इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यांनी यानंतर त्याची प्रतिपूर्ती केली असेल त्यांनी याची सूचना महापालिकेला द्यावी. कारवाई होणार नाही.

इतर ठिकाणच्या वास्तूंकडे मात्र दुर्लक्ष

सर्वोदय आश्रम ही गांधी विचाराला वाहून घेतलेली संस्था असून तेथे याच विचारांवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेचे कामकाज हे देणगीतून चालते. शासनाच्या विविध तरतुदीची पूर्तता करताना येणारा आर्थिक ताण सहन करीत ही संस्था काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या इमारतीला धोकादायक ठरवून वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, सर्वोदय आश्रमाच्या बाजूला मोठी झोपडपट्टी आहे. येथे दाटीवाटीने झोपडय़ा आहेत. आगीची शक्यता येथे अधिक आहे. अशाच प्रकारची परिस्थिती मोठय़ा मॉल्स आणि बर्डी, रामदासपेठ आणि अन्य भागातील उंच इमारती व हॉटेल्समध्ये आहे. मात्र तेथे आग प्रतिबंधक यंत्रणेकडे दुर्लक्ष आहे.