नि:शुल्क लाकडे उपलब्ध असल्याचे फलक लावण्याचे निर्देश

नागपूर : शहरातील दहन घाटावर करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडे नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर  काही घाटावर अजूनही नागरिकांकडून लाकडाचे पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक घाटावर नि:शुल्क लाकडे उपलब्ध असल्याचे फलक लावण्यात यावे व घाटावर जे कर्मचारी पैसे घेत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य सभापती महेश महाजन यांनी दिले.

दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी शव घेउन जाणाऱ्या नागरिकांमध्ये शुल्कासंदर्भात अनेक संभ्रम आहेत. त्यात त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून नियमाचा दाखला देऊन पैसे सुद्घा आकारण्यात येत असल्याची तक्रार समितीचे सदस्य नागेश मानकर यांनी केली होती.  सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या दहन घाटांव्यतिरिक्त सर्व घाटांवर नि:शुल्क लाकडे व ब्रिकेट्स उपलब्ध करण्यात येत होते. यानंतरही  घाटांवर करोनाबाधित मृतदेहाच्या दहनाकरिता लाकडांसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा, त्यावर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले.