उपराजधानीत हिंसक घटनांचे प्रमाण अधिक असून लोक खून, खुनाचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्य़ांमध्ये वापरण्यासाठी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉप क्ल्यूज आदी ऑनलाईन व्यापारी संकेतस्थळावरून शस्त्रे खरेदी करीत असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली. त्यामुळे येथे शस्त्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यादी पोलिसांना मेलवर उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा, गुन्ह्य़ात वापरलेले शस्त्र ऑनलाईन खरेदी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर पोलिसांनी कंपन्यांना दिला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यभरात गाजलेले बोले पेट्रोल पंप चौकातील बाल्या बिनेकर हत्याकांड आणि १७ नोव्हेंबर २०२० ला यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनांच्या घटनांमध्ये वापरण्यात आलेले चाकू हे ‘शॉप क्ल्यूज’ या संकेतस्थळावरून मागवण्यात आले होते.  पोलिसांनी सखोल तपास केला असता शहरात मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन शस्त्र मागवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. ऑनलाईन   कंपन्यांकडून गृहउपयोगासाठी चाकू विकण्यात येतात. पण, गुन्हेगार ऑनलाईन शस्त्र मागवून त्याचा वापर गुन्ह्य़ांमध्ये करीत आहेत.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १४४ अंतर्गत अधिसूचना प्रसिद्ध करून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन व शॉप क्ल्यूज या कंपन्यांना नोटीस बजावून नागपुरात ऑनलाईन शस्त्र विक्री केली असल्यास ग्राहकांची माहिती गुन्हे शाखेला सादर करण्याचे आदेश दिले. ग्राहकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घेऊन ते कोणत्या कारणासाठी विकत घेण्यात आले, याची चौकशी करण्यात येईल. हा आदेश ४५ दिवसांसाठी असून त्याची मुदत वाढवण्यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून आदेश निगर्मित करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी  दिली. ‘शॉप क्ल्यूज’ने गेल्या तीन महिन्यात १२२ लोकांना शस्त्र विकले.  त्यापैकी २९ जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून इतर ३ जण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून ३२ घातक चाकू जप्त केले आहेत.

ऑनलाईन व्यापार संकेतस्थळांना ठराविक बनावटीचे घरगुती शस्त्र विकण्याची मुभा आहे. पण, त्या शस्त्रांचा वापर गुन्ह्य़ांमध्ये होऊ नये. याकरिता त्यांच्याकडून ही माहिती सादर करणे आवश्यक आहे. अशा संकेतस्थळावरून कुणी शस्त्र खरेदी केली व त्याचा  गुन्ह्य़ात वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास कंपनीविरुद्धही फौजदारी कारवाई करण्यात येईल.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर.